आजकाल विविध माध्यमातून म्युच्युअल फंडाबाबत आणि त्यातील “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) या संकल्पनेविषयी जनजागृती केली जात आहे. पण या “एसआयपी’विषयी नवगुंतवणूकदारांना फारशी माहिती नसल्याचे लक्षात येते. अगदी थोडक्‍यात सांगायचे झाले, तर “एसआयपी’ (सिप) म्हणजे म्युच्युअल फंडातील “रिकरिंग डिपॉझिट’! आपण जसा कॉफीचा “सिप’ घेतो, तेवढे ते सोपे आहे! “एसआयपी’च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास, दीर्घकाळात या थेंबाथेंबांमधून संपत्तीचे तळे सहजपणे भरू शकते.
 
‘एसआयपी’ कसे करायचे? 
पुढील गोष्टी ठरवून आणि एक अर्ज भरून पहिला चेक द्यायचा, त्यानंतर पुढील हप्त्यांची रक्कम “इसीएस’ने आपल्या बॅंक खात्यातून परस्पर वजा होऊन भरली जाते.
1) म्युच्युअल फंडाची योजना, 2) दरमहा गुंतवणूक करण्याची रक्कम, 3) गुंतवणुकीची तारीख, 4) गुंतवणुकीचा कालावधी.
अगदी एका ‘एसएमएस’नेदेखील ‘एसआयपी’ सुरू करता येतो!
सध्या पैसे नाहीत किंवा वेळ नाही किंवा ही योग्य वेळ नाही’ अशा प्रकारची कारणे सांगून गुंतवणुकीसारखे महत्त्वाचे काम लांबणीवर टाकले जाते, त्यावर ‘एसआयपी’ हा रामबाण उपाय आहे, ज्यातून संपत्तीनिर्माणाचे अत्यंत महत्त्वाचे काम विनासायास होते. गरज आहे ती कृती करण्याची!
 
‘एसआयपी’ कितीचे करावे? 
‘एसआयपी’ला अगदी पाचशे रुपयांपासून सुरूवात करता येते. 
मासिक उत्पन्न – मासिक खर्च = मासिक गुंतवणूक, असे समीकरण न ठेवता, उत्पन्न – गुंतवणूक = खर्च असे धोरण ठेवले तर शिस्त राखली जाऊन दरमहा “एसआयपी’ नक्की होईल. म्हणजेच गुंतवणूक करायची रक्कम आधी निश्‍चित करून मगच उरलेली रक्कम खर्च करावी. आक्रमक धोरण स्वीकारून, सहज शक्‍य असेल त्या रकमेपेक्षा थोडे जास्त ध्येय ठेवावे.

अभिप्राय द्या!