म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना शेअऱ बाजारातील चढ उतारांच्या संदर्भात सर्वसामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न असतात. अशाच काही प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया.
प्रश्न : गुंतवणुकीसाठी बाजार खाली येण्याची वाट पाहावी का? 
उत्तर : शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी अचूक वेळ साधणे खूप अवघड असते आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी अशा “टायमिंग’ची गरजदेखील नसते. त्यामुळे बाजार खाली येण्याची वाट न पाहता शक्‍य तितक्‍या लवकर गुंतवणूक सुरू करणे योग्य ठरेल.
गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? 
उत्तर : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी कमीतकमी पाच वर्षांचा ठेवावा. त्यापेक्षा अधिक कालावधीचा दृष्टिकोन ठेवल्यास अधिक चांगले! शिवाय, बाजार कितीही आकर्षक दिसत असला तरीही आपली सर्व गुंतवणूक म्युच्यअल फंडात करू नये. तसेच, गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी “एसआयपी’चा मार्ग निवडावा.
 “एसआयपी’मध्ये दरमहा किती रक्कम गुंतवावी?
उत्तर : अशी रक्कम सांगणे अवघड आहे. कारण ‘एसआयपी’ची रक्कम प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. आपले दर महिन्याचे खर्च भागवून उरलेल्या रकमेपैकी काही हिस्सा ‘एसआयपी’मध्ये गुंतवावा. याशिवाय आपले भविष्यातील उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनदेखील आपण ‘एसआयपी’ची रक्कम ठरवू शकतो. उदाहरणार्थ, म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीवर पंधरा टक्के वार्षिक परतावा अपेक्षित धरून पंधरा वर्षांनंतर एक कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यक्तीने दरमहा साधारणतः पंधरा हजार रुपये हे चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेत नियमितपणे पंधरा वर्षे गुंतवावेत.
 ‘एसआयपी’ सुरू केल्यानंतर बाजार कोसळल्यास गुंतवणुकीमध्ये तोटा दिसतो, अशा वेळी काय करावे? 
उत्तर : असा तोटा हा फक्त कागदावर दिसणारा तोटा असतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावे आणि अशा परिस्थितीस गुंतवणुकीची संधी मानून, शक्‍य असल्यास थोडी अधिक गुंतवणूक करावी. अर्थात, त्यापूर्वी आपण निवडलेला फंड हा चांगला असल्याची खातरजमा तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यावी.
गेल्या काही वर्षांतील शेअर बाजारातील तेजी येणाऱ्या काळातही तशीच सुरू राहील का?
उत्तर : ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराने या प्रश्नाचा विचारदेखील करू नये. याउलट अधून-मधून गटांगळ्या खाणारा बाजारच स्वस्तात खरेदीची संधी निर्माण करतो, हे विसरू नये. बाजार कोणत्याही दिशेने गेला तरी गुंतवणुकीतील नियमितता सोडू नये.

अभिप्राय द्या!