शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील फायदे देते.
 
कमी जोखीम
गुंतवणुकीतील विविधता, अनेक गुंतवणूकदारांचा सहभाग, तज्ज्ञ व्यकींनी केलेले आर्थिक व्यवस्थापन यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमधील जोखीम कमी होते. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.
 
विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक
एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करून सामान्य गुंतवणूकदार अप्रत्यक्षपणे अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे मिळवितो. शिवाय यासाठी त्याला किचटक आमि वेळखाऊ प्रक्रियेलादेखील सामोरे जावे लागत नाही.
 
भावनिक ताणतणावांपासून सुटका
शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांना भावनिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. मात्र, म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार कोणत्याही शेअर खरेदी-विक्रीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने अशा ताणतणावांपासून तो दूर राहू शकतो.
 
गुंतवणुकीची वेळ साधण्याची कसरत
म्युच्युअल फंड व्यवस्थापकांकडे पुरेशी रक्कम नेहमी उपलब्ध असल्याने गुंतवणुकीची योग्य वेळ साधणे त्यांना शक्‍य होते. याउलट एकटा गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तेव्हा त्याच्यावर या मर्यादा येऊ शकतात.
 
गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकतो. शिवाय त्यासाठी त्याला अतिरिक्त रक्कम किंवा वेळ खर्च करावा लागत नाही.
 
प्राप्तिकरातून सवलत
इलएसएस म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्राप्तिकरातून वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आणि सवलती मिळतात. प्राप्तिकराच्या 80 सी या कलमानुसार ठराविक म्युच्युअल फंडांमध्ये (इएलएसएस) गुंतवणूक करून प्राप्तिकराचा बोजा कमी करता येतो.
 
थोडक्यात
1) सामान्य गुंतवणूकदाराचा “पोर्टफोलिओ’ उत्तम प्रकारे बनविण्यासाठी म्युच्युअल फंड अत्यंत उपयोगी ठरतात.
2) गुंतवणूक प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत असते.
3) गुंतवणुकीची रक्कम कमी-जास्त करता येते.
4) कमी जोखीम, गुंतवणुकीतील तरलता, प्राप्तिकरातून सवलत, तज्ज्ञांचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे फायदे!

अभिप्राय द्या!