इक्विटी म्युच्युअल फंडांतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत अलीकडे विक्रमी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातसुद्धा गुंतवणूकदारांची संख्या आणि पोर्टफोलिओची संख्या यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेअर बाजारात अस्थिरता असूनही इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी (इक्विटी) निगडित योजना असा गैरसमज अनेकांच्या मनात दिसून येतो. त्यामुळे बरीच मंडळी म्युच्युअल फंडापासून दूर राहतात. परंतु प्रत्यक्षात असे समजण्याचे कारण नाही. यानिमित्ताने म्युच्युअल फंडाविषयीचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न करूया.
1) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते आवश्‍यक अथवा अनिवार्य नाही. काही गुंतवणूकदार केवळ या गैरसमजामुळे म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांपासून दूर राहतात.
 
2) बहुतांश लोकांना असे वाटते, की म्युच्युअल फंडांच्या योजना फक्त शेअर बाजाराशीच निगडित असतात. म्युच्युअल फंड म्हणजे केवळ शेअर बाजार नाही. त्यांच्या इतरही (डेट, लिक्विड) योजना आहेत. त्यात शेअर बाजाराव्यतिरिक्त बॉंड्‌स, सरकारी रोखे यासारख्या अन्य गुंतवणूक साधनांतही पैसे गुंतविले जातात. आज म्युच्युअल फंडांकडे असलेल्या एकूण मालमत्तेपैकी बरीचशी गुंतवणूक ही शेअर बाजारमध्ये नाही.
 
3) बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो, की डेट योजनांमध्ये जोखीम नसते. डेट, लिक्विड योजनांमध्ये सुद्धा ठराविक प्रमाणात जोखीम असते.
 
4) सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) ही कोणती योजना नसून, ती एक गुंतवणुकीची पद्धत आहे. याद्वारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये मासिक अथवा त्रैमासिक पद्धतीने ठराविक रक्कम गुंतवू शकतात. थोडक्‍यात, बॅंकेतील रिकरिंग खात्याप्रमाणे म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे गुंतविले जातात.
 
5) काही एजंट्‌स गुंतवणूकदारांना असे सांगतात, की आमच्यातर्फे गुंतवणूक करा, कारण आम्ही कोणतेही शुल्क आकारात नाही. परंतु, 1 जानेवारी 2013 पासून, एजंटांतर्फे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी वेगळे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) असते, जे एजंट्‌सना देण्यात येणाऱ्या कमिशननुसार कमी असते. थेट गुंतवणूकदारांसाठी हेच निव्वळ मालमत्ता मूल्य जास्त असते. असे असले तरीसुद्धा, योजनांच्या सल्ल्यासाठी आणि इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी, एजंट्‌सतर्फे गुंतवणूक करावयास हरकत नाही.
6) निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) कमी म्हणजे योजना स्वस्त, चांगली आणि एनएव्ही जास्त म्हणजे योजना महाग हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. तुम्हाला कोणी केवळ या करणासाठी योजनांमध्ये गुंतवणूक करावयास अथवा योजनेत बदल करण्यास सांगत असेल तर तसे करणे चुकीचे ठरेल.
 
7) जेवढी जास्त विभागणी (डायव्हर्सिफिकेशन) तेवढा जास्त परतावा, हा सुद्धा एक गैरसमज आहे. पर्यायाने गुंतवणूक नियंत्रणात न राहून गोंधळ उडतो. वेगवेगळ्या मालमत्ता विभागात (ऍसेट क्‍लास) पुरेशी विभागणी करणे योग्य ठरेल.

अभिप्राय द्या!

Close Menu