आतापर्यंत म्युच्युअल फंड कंपन्या एका विभागामध्ये (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आदी) कितीही योजना आणू शकत होत्या, त्यामुळे योजनांचे पेव फुटून दोन हजारांच्या वर योजना तयार झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप याविषयी प्रत्येक म्युच्युअल फंड त्यांच्या स्वतंत्र व्याख्या ठरवीत होते आणि त्याप्रमाणे शेअर खरेदी करीत होते. यामुळे, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण होत होता आणि त्यांना विविध कंपन्यांच्या योजनांची योग्य तुलना करता येत नव्हती. योजनांची संख्या बरीच असल्याने कोणत्या म्युच्युअल फंडाची कोणती योजना निवडावी, यामध्येसुद्धा क्‍लिष्टता होती.  
 
विविध विभागांमध्ये एकसमानता, सुबोधता, सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणून गुंतवणूकदारांना योजनांची योग्य तुलना करता यावी आणि त्यांची योजनांची निवड अधिक बुद्धिनिष्ठ आणि तर्कसंगत व्हावी, या उद्देशाने सिक्‍युरिटीज एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) सहा ऑक्‍टोबर २०१७ रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप यांची व्याख्या ठरविण्यात आली, तसेच कमाल विभाग ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे एका विभागामध्ये एका म्युच्युअल फंडाला एकच योजना ठेवता येईल, असे नियम जारी केले. या नियमांनुसार पुढील पाच मुख्य विभाग ठरविण्यात आले आहेत – १) इक्विटी, २) डेट, ३) हायब्रिड, ४) सोल्युशन ओरिएंटेड आणि ५) इतर.  
 
यामध्ये पुन्हा पुढीलप्रमाणे उपविभाग मान्य केले गेले आहेत – १) इक्विटी विभागात मल्टी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, कॉन्ट्रा फंड आदी. २) डेट विभागात लिक्विड फंड, ओव्हरनाइट फंड, लो ड्युरेशन फंड आदी. ३) हायब्रिड विभागात काँझर्व्हेटिव्ह, बॅलन्स्ड, आर्बिट्राज आदी. ४) सोल्युशन ओरिएंटेड विभागात रिटायरमेंट आणि चिल्ड्रन फंड. ५) इतरमध्ये इंडेक्‍स फंड, फंड ऑफ फंड्‌स.  
 
असे एकूण ३६ विभाग आहेत. प्रत्येक विभागात एक योजना मान्य करण्यात आली आहे. सध्या देशात ४२ म्युच्युअल फंड कंपन्या आहेत आणि त्या सर्वांनी वरील सर्व उपविभागांमध्ये योजना राबविली तर सर्व म्युच्युअल फंडांच्या मिळून एकूण १५१२ योजना होतील. हा आकडा जरी जास्त वाटला तरी एक लक्षात घेतले पाहिजे, की त्यामुळे गुंतवणूकदारांच्या सर्व गरजा पूर्ण होतात आणि त्यांना दुसऱ्या मालमत्तेकडे वळावे लागत नाही. त्यामुळे हे बदल गुंतवणूकदारांच्या दृष्टीने स्वागतार्ह आहेत. अर्थात सर्वच्या सर्व म्युच्युअल फंड प्रत्येक उपविभागामध्ये योजना आणतीलच, असे नाही. त्याचप्रमाणे आता लार्ज कॅप म्हणजे बाजारातील मालमत्तेनुसार सर्वांत आघाडीच्या १०० कंपन्यांचे शेअर, मिड कॅप म्हणजे १०१ ते २५० आणि स्मॉल कॅप म्हणजे २५० च्या पुढील सर्व शेअर असे गृहीत धरले जाणार आहे. 
 

अभिप्राय द्या!