एचडीएफसी बॅंकेने नवीन प्रकारचे डिजीटल कर्ज देण्याची योजना आणली आहे. ग्राहकांकडे असलेल्या म्युच्युअल फंडाच्या आधारावर हे डिजीटल कर्ज त्वरित दिले जाणार आहे. या योजनेचे नाव डिजीटल लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड (एलएएमएफ) असे असणार आहे.
 
ग्राहकांकडे असलेल्या म्युच्युअल फंडाच्या युनिस्टना तारण ठेवत अवघ्या तीन मिनिटात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस अर्थात सीएएमएसशी संलग्न असलेल्या म्यु्च्युअल फंडाच्या संदर्भातच 
हे कर्ज मिळणार आहे. सीएएमएस मु्ख्यत्वे म्युच्युअल फंड धारकांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करते. 
 
म्युच्युअल फंडाच्या आधारावर मिळणाऱ्या कर्जासाठी ग्राहकांना सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवस लागतात. या डिजीटल कर्ज योजनेमुळे आता फक्त तीन मिनिटांतच कर्ज मिळणार आहे. म्युच्युअल फंडाच्या युनिस्टच्या आधारे मिळणारे डिजीटल कर्ज फक्त निवासी भारतीयांसाठीच असणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक मालकी असलेल्या पोर्टफोलिओच यासाठी पात्र असणार आहे.
 
एचडीएफसी बॅंकेच्या वेबसाईटवर जाऊन फक्त तीन सोप्या पायऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
 
1. एचडीएफसी बॅंकेच्या वेबसाईटवर गेल्यावर मायकॅम्स (myCAMS)मध्ये लॉग इन करून ज्या म्युच्युअल फंडाच्या आधारावर कर्ज घ्यायचे आहे त्याची पोर्टफोलिओमधून निवड करायची आहे.
2. त्यानंतर कर्जाच्या अटीं आणि शर्तीवर क्लिक करायचे आहे.
3. आपल्याला दिला गेलेला ओटीपी अर्थातच वन टाईम पासवर्ड टाकल्यावर खात्यात वापरण्यासाठी कर्ज तयार असेल.
 
ही नवीन सुविधा एचडीएफसी बॅंकेच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. मात्र कर्ज घेताना ग्राहकांचा म्युच्युअल फंड हा कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेसशी (सीएएमएस) संलग्न असलेल्या दहा म्यु्च्युअल फंड हाउसपैकी एखाद्या फंड हाउसचा असणे बंधनकारक आहे. 
 
म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूकीपैकी 60 टक्के रक्कम या आघाडीच्या दहा फंड हाउसमध्येच गुंतवली गेली आहे. ग्राहकांना हे डिजीटल कर्ज घेताना आपण गुंतवणूक केलेल्या कोणत्या म्युच्युअल फंडावर कर्ज घ्यायचे हे ठरवता येणार आहे. त्याचबरोबर हे कर्ज देताना ग्राहकांच्या म्युच्युअल फंडाचे मूल्य आणि युनिटची संख्या यांच्या आधारावर हे कर्ज मिळणार असल्याने त्या अनुषंगाने ग्राहकाला कर्ज घेताना नियोजन करता येणार आहे.
 
म्युच्युअल फंडाच्या आधारावर डिजीटल स्वरूपातील कर्ज ही पूर्णपणे नवीनच संकल्पना आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या सोयीनुसार लवचिकपणे कर्ज घेता येणार आहे. कर्ज मिळण्याची प्रक्रिया यामुळे खूपच सोपी होणार आहे. 

अभिप्राय द्या!