इंडेक्स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्स फंडांत गुंतवावी, असेदेखील त्यांनी सांगून ठेवले आहे. अमेरिकी इक्विटी म्युच्युअल फंडांतील एकूण गुंतवणुकीपैकी साधारणतः २५ टक्के हिस्सा इंडेक्स फंडांचा आहे आणि ही गुंतवणूक २०२४ पर्यंत ‘ॲक्टिव्हली मॅनेज्ड’ इक्विटी फंडांतील गुंतवणुकीलाही मागे टाकेल, असा अंदाज ‘मूडी’ या आंतराष्ट्रीय पतमापन संस्थेने वर्तविला आहे. हे झाले अमेरिकेतील चित्र! भारतात मात्र इंडेक्स फंडांतील गुंतवणूक ही एकूण म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेच्या फारच कमी म्हणजे अवघी ३ टक्क्यांच्या आसपास आहे. का आहे ही परस्परविरोधी स्थिती आणि काय आहेत हे इंडेक्स फंड्स? तेच आपण जाणून घेऊ या.
व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास म्युच्युअल फंडांचे साधारणतः दोन भागात वर्गीकरण करता येईल. १) ॲक्टिव्हली मॅनेज्ड फंड्स आणि २) पॅसिव्हली मॅनेज्ड फंड्स.
आरशातील प्रतिबिंबच!
‘ॲक्टिव्हली मॅनेज्ड’ फंडांचे व्यवस्थापन अतिशय सक्रियतेने केले जाते. त्यांची तुलना ही त्याच्या बेंचमार्क निर्देशांकाशी केली जाते. त्यामुळे बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देण्याच्या उद्देशाने फंड व्यवस्थापक पोर्टफोलिओ निवडत असतो. या उलट, ‘पॅसिव्हली मॅनेज्ड’ फंडाचा व्यवस्थापक बेंचमार्क निर्देशांकाशी निगडित परतावा देण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘निफ्टी फिफ्टी’वर आधारित फंडाचे देता येईल. ‘निफ्टी’ हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. ‘निफ्टी’वर आधारित फंडामध्ये सर्व निफ्टी कंपन्यांचे शेअर अगदी तंतोतंतपणे त्याच प्रमाणात असतात, ज्या प्रमाणात ते ‘निफ्टी’मध्ये असतात. जणू आरशातील प्रतिबिंबच म्हणा ना! त्यामुळे फंड व्यवस्थापकाला पोर्टफोलिओ निवडण्याची गरज नसते. ज्या प्रमाणात निफ्टी निर्देशांक वर अथवा खाली जाईल, त्यानुसार फंडाचा परतावा असेल. अशा फंडांना ‘इंडेक्स फंड्स’ म्हणतात.
इंडेक्स फंडांमध्ये व्यवस्थापकाला पोर्टफोलिओचे सक्रियतेने व्यवस्थापन करायचे नसल्यामुळे व्यवस्थापन खर्च हा ॲक्टिव्हली मॅनेज्ड म्युच्युअल फंडाच्या तुलनेत कमी असतो. इंडेक्स फंड व बेंचमार्क निर्देशांकाच्या परताव्यात थोडा फरक पडू शकतो. हा फरक अनेकदा ‘ट्रॅकिंग एरर’मुळे येतो. निर्देशांकातील शेअरची खरेदी आणि विक्री सतत आणि वेगवेगळ्या वेळी होत असल्यामुळे असे होते. गुंतवणूकदारांनी इंडेक्स फंडात गुंतवणूक करताना असाच फंड निवडावा, की जिथे ‘ट्रॅकिंग एरर’ कमीतकमी आहे; जेणेकरून त्यांना निर्देशांकाशी निगडित परतावा मिळेल.
अमेरिकेत लोकप्रिय का?
अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये इंडेक्स फंड्स अतिशय लोकप्रिय आहेत. याचे कारण म्हणजे तेथील बऱ्याचशा ॲक्टिव्हली मॅनेज्ड फंडांनी त्यांच्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा कमी परतावा दिलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार साहजिकच इंडेक्स फंडांकडे आकर्षित होतात. भारतात मात्र सहसा ॲक्टिव्हली मॅनेज्ड फंडांची कामगिरी निर्देशांकाच्या तुलनेत उजवी आहे. याचे एक कारण म्हणजे भारतासारख्या उदयोन्मुख आणि विकसनशील बाजारपेठेमध्ये बऱ्याच कंपन्या अशा आहेत, की ज्यांचा वेगाने विकास होत आहे आणि त्या निर्देशांकापेक्षा उत्तम परतावा देत आहेत. त्यामुळे अर्थातच गुंतवणूक पण प्रामुख्याने ॲक्टिव्हली मॅनेज्ड फंडांतच होत आहे. कमी व्यवस्थापन खर्च ही इंडेक्स फंडाची एक जमेची बाजू आहे. ज्या गुंतवणूकदारांना फक्त शेअर बाजाराची जोखीम घ्यायची आहे आणि फंड व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयांची जोखीम घ्यायची तयारी नाही, अशा गुंतवणूकदारांना इंडेक्स फंड्स हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. बघा पटतंय का?