आजकाल विविध माध्यमातून म्युच्युअल फंडाबाबत आणि त्यातील “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) या संकल्पनेविषयी जनजागृती केली जात आहे. पण बऱ्याचदा काही गुंतवणूकदार कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात आणि शेअर बाजाराप्रमाणे अल्पावधीत अधिक परताव्याची अपेक्षा धरतात. त्यामुळे कमी कालावधीत मात्र कमी परतावा मिळाल्यानंतर ‘एसआयपी’ बंद करण्याचा निर्णय घेतात. 
 
‘एसआयपी’ बंद करण्याआधी किंवा म्युच्युअल फंडातुन बाहेर पडण्याआधी गुंतवणूकदारांनी पुढील गोष्टींचा विचार करायला हवा 
 
1) जेव्हा तुमचा म्युच्युअल फंड ‘अंडरपरफॉर्म’ करतोय 
सर्व प्रथम म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवताना दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवायला हवे. त्यामुळे जेव्हा तुमचा म्युच्युअल फंड एखाद्या तिमाहीत ‘अंडरपरफॉर्म’ करत असेल अशावेळी ‘एसआयपी’ बंद करण्याची किंवा  म्युच्युअल फंडातुन बाहेर पडण्याची घाई करून नये. कारण बऱ्याचदा शेअर बाजारातील घडामोडींमुळे म्युच्युअल फंडातील तुम्ही निवडलेली योजना एखाद्या तिमाहीसाठी  ‘अंडरपरफॉर्म’ करू शकते म्हणजे कमी परतावा देऊ शकते. शिवाय बाजार सावरल्यानंतर मात्र अधिक चांगला परतावा त्यातून मिळू शकतो. त्यामुळे ‘एसआयपी’ बंद करण्याची घाई करू नका. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना साधारणतः किमान 3 ते 5 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा निर्धार हवा. 
2) जेव्हा म्युच्युअल फंड योजनेचा उद्देश आपल्या उद्दीष्टाशी जुळत नसतो
म्युच्युअल फंड व्यवसायाचा विस्तार मोठा आहे परिणामी यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सतत बदल केले जात असतात. उदा. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना डायवर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केली असेल. मात्र काही दिवसांनी कंपनीच्या व्यवस्थापनाने तुमची योजना बँकिंग फंडमध्ये विलीन करण्याचे ठरवल्यास म्युच्युअल फंड योजनेचा उद्देश आपल्या उद्दीष्टाशी जुळत नसतो. अशा वेळी ‘एसआयपी’ बंद करण्यापेक्षा ती दुस-या फंडमध्ये स्थानांतरित करू शकता. 
पण हे  करताना आपल्या सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा !!

अभिप्राय द्या!