रिलायन्स पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा फंड मुख्यत्वे विद्युत (निर्मिती, पारेषण आणि वितरण) आणि पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे. रिलायन्स डायव्हर्सीफाइड पॉवर सेक्टर फंडाला २८ एप्रिल २०१८ पासून रिलायन्स पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा फंड ही नवीन ओळख मिळाली. फंडाच्या गुंतवणुकीत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, केईसी, जीई पॉवर, पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन, जिंदाल स्टेनलेस स्टील (हिस्सार), केएसबी पंप, अपार इंडस्ट्रीज, टोरेन्ट पॉवर आणि एनटीपीसी या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. फंड सक्रिय व्यवस्थापन असलेला फंड असून मागील महिन्यांत फंडाने आयसीआयसीआय बँक आणि टेक्समॅको या गुंतवणुका विकून टाकून भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंडिया सिमेंट, भारती एअरटेल, जेके सिमेंट या कंपन्यात नव्याने गुंतवणूक केली. फंडाच्या गुंतवणुकीत मिड कॅप प्रकारच्या समभागांचे वर्चस्व आहे. संजय दोशी या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.

मार्च २०१६ पासून इन्फ्रास्ट्रक्चर फंडांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. एल अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड, एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड यांसारख्या फंडांची या सदरातून या आधी शिफारस केली असून कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचा समावेश ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ या शिफारसप्राप्त फंडांच्या यादीत २०१४ पासून आहे. सेक्टोरल फंड गुंतवणुकीस धोकादायक असले तरी आर्थिक आवर्तनानुसार गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ शकतात. गुंतवणुकीत आरोग्य निगा आणि उपभोगाच्या वस्तूत गुंतवणूक करणारे आणि संरक्षित समजले जाणारे फंड आणि आर्थिक आवर्तनाशी निगडित बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड असल्यास गुंतवणुकीत संतुलन साधले जाते. सामान्य गुंतवणूकदार सेक्टोरल फंडात नेहमीच आर्थिक आवर्तन शेवटच्या टप्प्यात असताना गुंतवणूक करतात. फार्मा फंडात २०१४ मध्ये आणि बँकिंग क्षेत्रात २०१५ मध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली गेली. २००७ मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडांचा एका वर्षांचा परतावा २०-२१ टक्के असल्याने गुंतवणूकदारांना ते आपलेसे वाटत होते. २००८ मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडांचा एका वर्षांचा परतावा उणे ५३ टक्के होता.

इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगासाठी अजून ३ ते ५ वर्षे चांगला परतावा देणारी असतील, असा अंदाज वेगवेगळ्या आकडेवारीवर विसंबून बांधता येतो.

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ असलेला आणि विकासाचे प्रतीक समजला जाणारा हा फंड भविष्यात ३ ते ४ वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देईल. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखीम निश्चितीप्रमाणे या फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करावा.

अभिप्राय द्या!

Close Menu