सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खासगी कंपनी रॉयल सुंदरम्‌ जनरल इन्शुरन्सने एकत्र कुटुंबाची गरज लक्षात घेत “फॅमिली प्लस- द 5 जी इन्शुरन्स प्लान’ ही सर्वसमावेशक विमा योजना बाजारात दाखल केली आहे. या योजनेत कुटुंबातील जवळपास 19 सदस्यांना विमा सुरक्षा मिळणार आहे. प्रत्येक सदस्याला ठराविक हमी रक्कम मिळणार असून फ्लोटर रक्कम एक सदस्य किंवा अनेक सदस्यांना वापरता येणार आहे. 
 
फॅमिली प्लस योजनेत इतर फ्लोटर पॉलिंसीप्रमाणे प्रौढांची-मुलांची संख्या, मुलांचे वय, प्रौढांमधील नातेसंबंध याबाबत कोणतेही बंधन नाही. ज्यामध्ये कुटुंब प्रमुख त्यांची मुले, सुना, जावई आणि नातवंडे या सर्वांना विमा कवच पुरवले जाणार आहे. “फॅमिली प्लस”च्या माध्यमातून विम्याच्या व्यक्तिगत, छोट्या कुटुंबाच्या आणि विस्तारीत कुटुंबाच्या आरोग्य विम्याच्या गरजा भागवल्या जातील, असा विश्‍वास सुंदरम्‌ जनरल इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन अधिकारी निखिल आपटे यांनी सांगितले. 
 
बदलत्या जीवनशैलीमुळे ह्दय विकार, मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसे किंवा मूत्रपिंड बिघाड यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दर्जेदार वैद्यकीय उपचारांसाठी मोठी रक्कम हाताशी असणे आवश्‍यक आहे. फॅमिली फ्लस योजत व्यक्तिगत पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर असे दुहेरी विमाधारकाला हमी मिळते. ते पुढे म्हणाले, या उत्पादनाला, नो क्‍लेम बोनसचा फायदाही आहे, ज्यामुळे व्यक्तिगत पातळीवरील हमीरक्कमेत दरवर्षी 20 टक्के वाढ होते.म्हणूनच फॅमिली प्लस योजना किफायतशीर आरोग्य विमा योजना असल्याचा दावा त्यांनी केला. या योजनेत 18 वर्षांवरील प्रौढ व्यक्‍ती आरोग्य विम्यासाठी पात्र असून ज्येष्ठ नागरिकांना वयाची अट नाही. या योजने 91 दिवसांच्या बाळालाही विमा कवच मिळणार आहे. व्यक्‍तिगत विमा 2 ते 15 लाख आणि कुटुंबासाठी फ्लोटर 3 ते 50 लाखांचे घेता येईल,

अभिप्राय द्या!