घर, जमीन यासारख्या विक्री व्यवहारातून, निवृत्तीनंतर किंवा बॅंकेतील ठेवीची किंवा पीपीएफची मुदत संपल्यावर किंवा शेअर्स वा म्युच्युअल फंड विक्रीतून मोठी रक्कम आपल्या खात्यात जमा होणार असेल व अशी रक्कम आपल्याला एकरकमी गुंतवायची नसेल, तर काय करता येईल? जर ही रक्कम बचत खात्यात राहिली, तर सध्या केवळ 3.5 टक्केच व्याज मिळू शकते. गुंतवणुकीबाबत निर्णय होण्यास कधीकधी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साहजिकच 3.5 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा (रिटर्न) मिळविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असतो. यावर लिक्विड म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे. काय आहे हा लिक्विड म्युच्युअल फंड, हे आज आपण पाहू.
म्युच्युअल फंडाच्या लिक्विड स्कीममधील गुंतवणूक विविध प्रकारच्या अल्प मुदतीच्या (शॉर्ट टर्म) पर्यायात केली जाते. ज्याची मुदत पुढील 91 दिवसांत संपणार असते. (उदा. कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट) असे असले तरी बहुतेक म्युच्युअल फंड ज्या गुंतवणूक पर्यायांची मुदत पुढील 15 ते 20 दिवसांतच संपणार आहे, असे पर्याय प्रामुख्याने निवडतात. जेणेकरून अशी गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची होते. शिवाय 6 ते 7 टक्के इतका परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे आपण रक्कम गुंतविल्यापासून ते रक्कम काढेपर्यंत वरील दराने परतावा मिळू शकतो आणि आपल्याला हवी तेवढी रक्कम हवी तेव्हा काढता येते. आपण दुपारी दोन वाजेपर्यंत रीडम्शन स्लीप दिल्यास कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा होते. यासाठी कोणतेही शुल्क (एक्झिट लोड) लावले जात नाही.
याशिवाय आपल्याला जर अशी रक्कम शेअर्स अथवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायची असेल आणि बाजार तेजीत असेल, तर अशावेळी आपल्याकडील रक्कम लिक्विड फंडात गुंतवून त्यातून योग्य वेळी शेअर्समध्ये किंवा एसटीपी (सिस्टेमॅटीक ट्रान्स्फर प्लॅन) पद्धतीने आपल्याला हव्या त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकता. असे करण्याने बाजारात तेजीमुळे असणारी जोखीम आपण कमी करू शकतो. करबचतीच्या दृष्टीनेसुद्धा लिक्विड फंड हे बचत खाते अथवा अल्प मुदतीच्या ठेवींपेक्षा फायदेशीर ठरू शकतात. आपण जर 10 किंवा 20 टक्क्यांच्या “टॅक्स स्लॅब’मध्ये असाल, तर ग्रोथ ऑप्शन घेणे फायदेशीर ठरते आणि जर 30 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये असाल, तर डिव्हिडंड ऑप्शन घेणे फायदेशीर ठरते.
सध्याचे बॅंकांचे व्याजदर व त्यात भविष्यात होणारी आणखी घसरण विचारता घेता सामान्य गुंतवणूकदाराने या पर्यायाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. पारंपारिक गुंतवणुकीतून होणारे नुकसान विचारात घेता योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊन लिक्विड फंडात गुंतवणूक जरूर करावी.