मिरॅ असेट हेल्थकेअर फंड  गुंतवणुकीस खुला झाला आहे. या फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये २६ जून २०१८ पर्यंत गुंतवणूक करता येईल. दहा दिवसानंतर हा फंड नियमित गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड औषध निर्माण, रोग निदानपूर्व चाचण्या, रुग्णालये, आरोग्य विमा, वैद्यकीय उपकरणे निर्माते आणि पुरवठादार (आयातदार) यांच्याशी संबंधित व्यवसायातून गुंतवणूक करेल. या उद्योगांपैकी औषधनिर्मिती उद्योगाची वार्षिक १ लाख कोटींची उलाढाल आहे. रुग्णालये २.५ लाख कोटी, निदानपूर्व चाचण्या ४३ हजार कोटी, आरोग्यविमा उद्योगाच्या विमा हप्ता २२ हजार कोटी आणि वैद्यकीय उपकरणे आयात आणि निर्माती ही ५३ हजार कोटींची बाजारपेठ आहे. आरोग्य निगा क्षेत्र हा नियंत्रित उद्योग असल्याने, नव्याने पदार्पण करण्यास अत्यंत कठीण उद्योग क्षेत्र मानले जात असले तरी या आरोग्य निगा क्षेत्राच्या काही घटकांच्या नफ्याचे प्रमाण उत्तम आहे.

रुग्णालये हा व्यवसाय भारतात अत्यंत किफायतशीर आहे. रुग्णालय चालविणे हा व्यवसाय अंबानी बंधूंपासून ते मागील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील टाइम हॉस्पिटलचे प्रवर्तक खासदार नारायण राणे यांच्यासारख्या राजकारण्यांना हा व्यवसाय प्रिय आहे. फोर्टिस हेल्थकेअरच्या अधिग्रहणाच्या निमित्ताने पंचतारांकित रुग्णालयाच्या प्रति खाट असलेल्या नफ्याचे पुढे आलेले प्रमाणही हा व्यवसाय सर्वाना का प्रिय आहे ते स्पष्ट करते. रुग्णसेवा वगैरे सर्व झूट आहे. रुग्ण सेवेच्या बुरख्याखाली या व्यवसायातील भरघोस नफ्याचे प्रमाण हे भारतात तारांकित रुग्णालयाची उभारणी करण्यास अनेक मंडळींना उद्युक्त करीत आहे. भारतात प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७ खाट हे प्रमाण असून जागतिक सरासरी प्रति हजारी ३० खाटा असे आहे. आरोग्य विम्याबाबत येत असलेली सजगता आणि प्रस्तावित ‘आयुष्मान भारत’सारखी सामाजिक आरोग्य विमा योजनेमुळे आजपर्यंत आवाक्याबाहेर असलेले वैद्यकीय उपचार जनसामन्यांच्या आवाक्यात येत आहेत. भारतात ७० टक्के वाटा खासगी मालकीच्या रुग्णालयांचा असून या रुग्णालयालातील उपलब्ध खाटांचे प्रमाण ६३ टक्के आहे.

प्रत्यक्षात आज निफ्टीतील आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांचे निफ्टीतील बाजारमूल्य २ टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. परिणामी आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची किंमत नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षक पातळीवर आली आहे. तीन ते पाच वर्षांसाठी या फंडात गुंतवणूक कंल्यास आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोखिमांकाचा विचार करून या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय करावा.

अभिप्राय द्या!