चार सप्टेंबर 2017 च्या “सकाळ’मध्ये “इन्फोसिस’च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30 टक्के फायदा झाला आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे “टीसीएस’ कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी रुपयांपर्यंतची होणार असून, प्रतिशेअर किंमत 2100 रुपये निश्चित केली गेली आहे. रेकॉर्ड तारीख अजून जाहीर व्हायची आहे. 7.62 कोटी शेअरची पुनर्खरेदी होणार असून, सध्याच्या नियमांप्रमाणे त्यातील 15 टक्के म्हणजेच 1.14 कोटी शेअर्स हे छोट्या (रिटेल) भागधारकांसाठी राखीव आहेत. कंपनीच्या मार्च 2018 च्या वार्षिक अहवालानुसार 6.85 कोटी शेअर हे रिटेल विभागामध्ये आहेत. ज्यांच्याकडे रेकॉर्ड तारखेला त्या दिवशीच्या बंद भावाप्रमाणे, दोन लाख रुपयांपर्यंत किंवा कमी किमतीचे शेअर आहेत, असे सर्व भागधारक हे “रिटेल’ विभागामध्ये येतील. याचा अर्थ पुनर्खरेदीसाठी शेअर स्वीकारण्याची शक्यता (रेशो) 17 टक्के येते. म्हणजेच तुम्ही 100 शेअर पुनर्खरेदीसाठी दिले, तर त्यातील 17 शेअर 2100 या किमतीला स्वीकारले जाऊ शकतात.
रिटेल विभागामध्ये जास्तीत जास्त किती शेअर तुम्ही पुनर्खरेदीकरिता देऊ शकता? आज आपल्याला रेकॉर्ड तारीख आणि त्या दिवसाचा भाव माहीत नाही, पण तो पुनर्खरेदी किमतीपेक्षा (2100) कमीच असेल म्हणून आपण ती किंमत (2100) गृहीत धरली, तर तुम्ही रिटेल विभागामध्ये जास्तीत जास्त 95 शेअर घेऊ शकता. सक्सेस रेशो 17 टक्के धरला, तर तुमचे 16 शेअर 2100 रुपयांना जाऊ शकतील. 15 जून 2018 तारखेचा बंद भाव आहे 1841 रुपये. हा भाव तुमची खरेदी किंमत म्हणून गृहीत धरला, तर तुमचा 16 शेअरवरचा परतावा येतो साधारण 12 टक्के. 16 शेअरची खरेदी किंमत 29,456 आणि विक्री किंमत 33,600 आणि नफा 4144. महत्त्वाचे म्हणजे तोसुद्धा साधारणपणे 4 ते 5 महिन्यांत!
जोखीम काय आहे?
1) पुनर्खरेदीनंतर तुमच्याकडे शिल्लक राहिलेल्या शेअरचा भाव तुमच्या खरेदीपेक्षा खाली जाऊ शकतो. तसेच, एक लक्षात घेतले पाहिजे, की जर तुमच्या डी-मॅट खात्यामध्ये “टीसीएस’चे दोन लाख रुपयांच्या वर शेअर असतील, तर तुम्ही रिटेल विभागामध्ये येणार नाहीत.
बहुतांश भागधारकांना पुनर्खरेदीची तारीख, पद्धत आणि फायदे माहीत नसल्याने ते त्यांचे शेअर पुनर्खरेदीसाठी पाठवत नाहीत; ज्यामुळे उरलेल्या भागधारकांना फायदा होऊन त्यांचे 100 टक्के शेअरसुद्धा पुनर्खरेदी केले जाऊ शकतात. याआधीच्या मे 2017 मधील “टीसीएस’च्या पुनर्खरेदीमध्ये रिटेल विभागामध्ये 100 टक्के शेअर स्वीकारले गेले होते.
तात्पर्य – “टीसीएस’चे शेअर रेकॉर्ड तारखेच्या आधी खरेदी करून पुनर्खरेदीसाठी देणे योग्य वाटते.