पैशाला दोन वाटा असतात. एक मिळकतीची व दुसरी खर्चाची. मिळकतीच्या व खर्चाच्या वाटेचेही दोन प्रमुख भाग करता येतील. एक वैध मार्गाने मिळणारा, दुसरा अवैध मार्गाने मिळणारा पैसा. तसेच वैध कारणाकरिता खर्च होणारा पैसा व अवैध कारणांकरिता खर्च होणारा पैसा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळत असते, पण त्या प्रेरणेला तुम्ही कशाप्रकारे, कशाकरिता प्रतिसाद देता, हे सर्वांत महत्त्वाचे ठरते. पैशाच्या बाबतीत तर हे अत्यंत कळीचे ठरते. जर मिळणारा पैसा मर्यादित स्वरुपाचा असेल, तर अशावेळी खर्चाच्या प्रेरणेला दिला जाणारा प्रतिसाद हा अधिक महत्त्वाचा ठरतो. जर तो वैध कारणासाठी दिला गेला नाही, तर कर्जबाजारीपणा येऊ शकतो अथवा प्रसंगी अवैध मार्गाने पैसा मिळविण्यासाठी प्रतिसाद दिला जाणे शक्‍य असते. खर्चाला फुटणारी वाट नियंत्रित करणे हेच खरे संपत्ती नियमनाचे गमक आहे. नियमित व सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा पाया बचतीतच असतो. यासाठी खर्चावर जो नियंत्रण मिळवितो, तोच संपत्ती जमा करण्यात निश्‍चित यशस्वी होतो. नियमित उत्पन्नाला जोड व्यवसायाच्या पर्यायातून वैध मार्गाने पैसा कमविला तरी तो वैध कारणासाठी खर्च होणे अपेक्षित असते. थोडक्‍यात, अक्कलहुशारीने खर्च करणे किंवा खर्च नियंत्रणात ठेवणे म्हणजे एकप्रकारे पैसा मिळविल्यासारखेच आहे. यासाठी पुढीलप्रमाणे काही सोपे उपाय करता येऊ शकतात –
1) खर्चाचे अंदाजपत्रक मांडणे,
2) अचानक येऊ शकणारे खर्च विचारात घेऊन तरतूद करणे,
3) खरेदीला निघताना कोणत्या गोष्टी खरेदी करावयाच्या आहेत, याची यादी करूनच बाहेर पडणे,
4) घरातून निघताना आवश्‍यकतेपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ न बाळगणे,
5) डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड बरोबर ठेवणे म्हणजे खर्च करण्यापूर्वी विचार केला जाईल, 6) वस्तू खरेदी करताना तिच्या दीर्घकाळ वापराचा अथवा त्या वस्तूचे आयुर्मान विचारात घेऊन खरेदी करण्याचा विचार करणे.
 
यासारखे अनेक साधे उपाय अमलात आणून आपल्या खर्चावर नियंत्रण आणणे शक्‍य आहे. वाचवलेला किंवा बचत केलेला पैसा हा मिळकतीसारखाच असतो. तेव्हा पैशाला खर्चाची वाट दाखविण्याअगोदर त्या खर्चासाठी निर्माण झालेली प्रेरणा व त्याला तुम्ही देत असलेला प्रतिसाद यात जो वेळ मिळतो, त्या वेळात सारासार विचार करून योग्य खर्च करणे जास्त गरजेचे असते.

अभिप्राय द्या!