व्याजदरांत होणाऱ्या बदलांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच, डेट गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळत असल्याने पारंपरिक मुदत ठेवींपेक्षा फिक्सड मॅच्युरिटी प्लॅन्समध्ये (एफएमपी) गुंतवणूक करण्यावर गुंतवणूकदारांचा भर दिसत आहे. एफएमपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सुरक्षितही असल्याने यातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. एफएमपी हे ठरावीक मुदतीचे डेट फंड असतात. हा कालावधी एक महिना, ९० दिवस ते पाच वर्षांपर्यंत असू शकतो. या फंडात तीन वर्षांचा कालावधी निवडल्यास गुंतवणूकदाराला दीर्घकालीन भांडवली करातून (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) सवलत मिळत असल्याने अनेक जण हाच कालावधी निवडतात. निर्धारित मुदतीत स्थिर परतावा देणे हे या एफएमपीचे उद्दिष्ट असते. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा या गुंतवणुकीवर परिणाम होत नाही.
एफएमपीमधून गोळा झालेला पैसा हा साधारणत: सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स, कमर्शिअल पेपर्स, ट्रिपल ए मानांकित कंपनी रोखे आदींमध्ये गुंतविण्यात येतो. हा पैसा बँकेच्या मुदत ठेवींतही गुंतविला जातो. मात्र हा निधी कधीही इक्विटीमध्ये ठेवला जात नाही.
अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांमुळे व्याजदरांत होणाऱ्या चढ-उतारांपासून मिळणारे संरक्षण व करसंबंधी लाभ हे एफएमपीचे प्रमुख फायदे आहेत. मुदत ठेवींतून मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत एफएमपीचा परतावा अधिक असतो. ही गुंतवणूक ठरावीक काळासाठी असल्याने अन्य डेट फंडांप्रमाणे यात खरेदी-विक्री करता येत नाही व त्यामुळे संबंधित शुल्कदेखील वाचते.
तरलतेचा अभाव हा एफएमपीचा प्रमुख तोटा आहे.