प्रातिनिधिक तीन योजनांची माहिती
फ्रॅंकलिन इंडिया प्रायमा फंड ः १९९३ मध्ये सुरू झालेला आणि सातत्याने उत्तम कामगिरी करीत राहिलेला हा फंड त्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पोचला आहे. या फंडाची एनएव्ही आता एक हजार रुपये प्रति युनिटच्या जवळ पोचली आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत या फंडाने जवळजवळ २१ टक्के भरघोस वार्षिक परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यावर या फंडाच्या मालमत्तेचे बाजारमूल्य आता ६३०० कोटी रुपयांच्या पुढे पोचले आहे. शेअर बाजारातील तेजी-मंदीच्या चढ-उतारात या फंडाने योग्य गुंतवणुकीच्या आधारावर दीर्घकाळात उत्तम कामगिरी ठेवली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडात सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल, त्यांना त्याचा उत्तम परतावा नक्की मिळाला असेल.
 
एचडीएफसी इक्विटी फंड ः १९९५ मध्ये सुरू झालेला हा फंड गेली २३ वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे. गुंतवणूकदारांच्या भांडवलाची वृद्धी करून देण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करतो. मार्च २०१८ मध्ये या फंडांच्या मालमत्तेचे बाजारमूल्य २० हजार कोटी रुपये झाले होते. यावरून याच्या प्रचंड विस्ताराची कल्पना येऊ शकते. गेल्या २३ वर्षांत या फंडाने सरासरी १९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या फंडाची एनएव्ही जवळजवळ ६०० रुपये प्रतियुनिटपर्यंत पोचल्याचे पाहून प्रथमदर्शनी हा फंड महाग वाटू शकतो. मात्र, म्युच्युअल फंडाची एनएव्ही आणि त्यातील गुंतवणुकीतून मिळणारा फायदा याचा संबंध नसतो, तर तो फंड ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो, त्या शेअरच्या बाजारभावावर गुंतवणूकदारांचा फायदा अवलंबून असतो, हे सूत्र गुंतवणूकदारांनी कायम लक्षात ठेवावे.
 
रिलायन्स ग्रोथ फंड ः १९९५ मध्ये सुरू झालेला हा आणखी एक उत्तम फंड! दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली, तर परताव्याचा दर कमालीचा वाढू शकतो, हे या फंडाच्या कामगिरीतून दिसून येते. १९९५ मध्ये १० रुपयांपासून सुरू झालेली एनएव्ही आता जवळजवळ ११०० रुपये प्रतियुनिटपर्यंत पोचली आहे. प्रतियुनिट एक हजार रुपये ‘एनएव्ही’चा टप्पा प्रथम गाठण्याचा मान या फंडाने मिळविलेला आहे. याचाच अर्थ, ज्या गुंतवणूकदाराने या फंडात सुरवातील एक लाख रुपये गुंतविले होते, त्याच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य आज अंदाजे एक कोटी रुपयांच्या आसपास झाले आहे. या फंडाच्या मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य जवळजवळ ६६०० कोटी रुपये आहे. अर्थात, या फंडालासुद्धा निव्वळ मालमत्ता मूल्यातील मोठ्या चढ-उतारांचा सामना करावा लागला. ज्या गुंतवणूकदारांनी या चढ-उतारात त्यांची गुंतवणूक सुरू ठेवली, त्यांना त्याचा उत्तम परतावा मिळाला आहे. 
 
वरील तीन फंडांची माहिती ही केवळ उदाहरणादाखल दिली आहे. याचा अर्थ फक्त या तीन योजनाच सर्वोत्तम आहेत, असे नाही. याप्रमाणे इतरही अनेक चांगल्या योजना आहेत. दीर्घकाळात म्युच्युअल फंडातून धनवृद्धी कशी होऊ शकते, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आपण जर योग्य योजनांमध्ये दीर्घकाळासाठी नियमितपणे गुंतवणूक केली तर त्याचा उत्तम परतावा हमखास मिळतो, हे या उदाहरणांतून स्पष्ट होते. शेअर बाजारात चढ- उतार हे होतच राहणार, त्यानुसार योजनांची कामगिरी कमी- जास्त दिसणार. पण ‘फॉर्म इज टेम्पररी, क्‍लास इज परमनंट’ हे सूत्र लक्षात ठेवून संयमाने आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याने संपत्तीनिर्मिती होऊ शकते, हे लक्षात ठेवावे. 

अभिप्राय द्या!