
1. बचतीचे महत्त्व
“तुम्हाला पैशाची किंमतच नाही” हा घराघरात वापरला जाणारा वाकप्रचार. अलीकडच्या काळात चैनीवर पैसा खर्च करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. आयुष्यात हौसमौज पूर्ण करण्यात वावगे काहीच नाही. मात्र त्याआधी आवश्यक असलेली बचत नक्कीच केली पाहिजे. नवराबायको कमावते असण्याच्या काळात बचतीचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात घ्यायची वेळ आली आहे. मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्याची सवय लावली पाहिजे. यातून त्यांना आपल्या वाट्याला येणाऱ्या पैशाचे नियोजन, खर्च आणि बचतीचा ठोकताळा मांडण्याची सवय जडेल. हिच सवय त्यांना भविष्यात संपत्ती निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरेल. गरज आणि चैन यातील फरक मुलांच्या लक्षात आणून दिला पाहिजे.
2. मेहनतीचे फळ मिळतेच
मुलांना दैनंदिन लहान लहान उदाहरणांवरून कष्टाचे किंवा मेहनतीचे महत्त्व समजावू दिले पाहिजे. त्यामुळेच त्यांना आव्हानात्मक कामे करण्यासाठी उद्युक्त करा. ती यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांना बक्षिससुद्धा द्या. आयुष्यात पैसा आणि मानसिक तृप्तता मेहनतीतूनच मिळते हे आपल्या मुलांच्या मनावर छोट्या उदाहरणांवरून बिंबवा.
3. मुलांना परजीवी होण्यापासून वाचवा
आपण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो. या प्रेमापोटीच आपण त्यांच्या गरजेच्या वस्तूंचा त्यांच्यावर वर्षाव करत असतो. परंतु यातून काहीही न करता गरजा पूर्ण होण्याची वृत्ती लहान मुलांमध्ये निर्माण होण्याचा धोका असतो. त्याउलट आपण स्वत:च्या पायावर उभं राहण्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून द्यावे. आपल्या प्रत्येक गरजेसाठी आपण आपल्या पालकांच्याच खिशाला हात घालता कामा नये हे त्यांना समजावले पाहिजे. मुले मोठी झाली असतील तर त्यांना पार्ट टाईम जॉब्स किंवा त्यांच्या आवाक्यातील कामे करून स्वत:चा पॉकेटमनी स्वत:च मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. भविष्यात नोकरी करत असताना किंवा व्यवसाय करताना आत्मनिर्भर होण्याची वृत्ती आणि जिद्द बालपणीच्या या सवयीमधूनच जन्माला येईल. आपल्या आर्थिक संकंटांचा सामना ते स्वबळावर करू शकतील.
4. आपत्कालीन निधीचे महत्त्व
सकारात्मक किंवा आशावादी विचारसरणीच्या नावाखाली आपण भविष्यातील अनपेक्षित संकटांची (इथे आर्थिक संकटे अपेक्षित आहेत) तयारी किंवा नियोजन करण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मुलांना भविष्यातील सुखद स्वप्नांची गुंफताना वास्तवापासून बऱ्याचवेळा आपण दूर नेत असतो. आपल्या आयुष्यात आर्थिक संकटं येणार नाहीत अशाच भ्रमात आपण त्यांना ठेवत असतो. त्यामुळे या गोष्टींसाठी काही नियोजन करावं लागतं हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते. मुलांना आपल्या पॉकेटमनीतील किंवा पार्टटाईम जॉबमधील काही पैसा हा इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवण्यास शिकवावे. आपल्या सहा महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवणे आवश्यक असते हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा नियम मुलांना नोकरी किंवा व्यवसायाला सुरूवात केल्यावर सहजतेने अंमलात आणता येईल. आर्थिक विवंचनांच्या काळात किंवा अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांच्यावेळी हा आपत्कालीन निधीच उपयोगी पडतो हे मुलांच्या लक्षात येईल.
5. आर्थिक शिस्त
आपल्याकडे येणारा पैसा आणि होणार खर्च याची बारकाईने नोंद ठेवून आपले आर्थिक नियोजन करण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज असते. आर्थिक शिस्तीशिवाय आर्थिक प्रगती साधता येत नाही हे लहान वयातच मनावर बिंबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बचतीचे प्रमाण वाढते ठेऊन अनावश्यक खर्च कमी करत जाणे या महत्त्वाच्या अर्थमंत्राची जाणीव विद्यार्थी दशेतच आपल्या मुलांना होणे अतिशय आवश्यक आहे. कोणतेही अनावश्यक कर्ज डोक्यावर नसणे, टॅक्स वेळेवर भरणे, आपल्या आर्थिक गरजांवर नियंत्रण ठेवणे या आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल सजगपणा मुलांमध्ये तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
6. बजेटची आखणी
पगार झाल्यानंतर काही दिवसांतच हाती बेताचाच पैसा शिल्लक राहणे ही बहूसंख्य लोकांच्या आयुष्यातील डोकेदुखी आहे. याचे मुख्य कारण आर्थिक नियोजनाचा अभाव किंवा बजेटची आखणी योग्य पद्धतीने न करणे हेच असते. बजेट आखताना आपल्या अत्यावश्यक गरजा कोणत्या, महत्त्वाचे आणि टाळता न येणारे खर्च कोणते, टाळता येणारे किंवा कमी महत्त्वाचे खर्च कोणते, चैनीचे खर्च आणि आपल्या गरजांसाठीचे खर्च यातील फरक लक्षात घेणे, एकदा बजेट आखल्यानंतर त्यानुसारच काटेकोरपणे खर्च करणे या सर्वांचे आकलन मुलांना होणे खूपच महत्त्वाचे आहे. कुठे बचत करावी आणि कुठे खर्च करावा याचे शिक्षण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना देणे आवश्यक आहे.
7. गुंतवणूकीचा फंडा
बचत हा संपत्ती निर्मितीतला महत्त्वाचा घटक आहे. परंतु नुसती बचत केल्याने कोणीही श्रीमंत होत नाही. गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय कोणते, कोणता पर्यात महागाईला हरवतो, गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे या गोष्टींचे ज्ञान मुलांना देणे हा त्यांच्या शिक्षणाचाच एक भाग आहे. वाढदिवस, समारंभ, बक्षिसे या वेगवेगळ्या कारणास्तव मुलांकडे काही रोख रक्कम येत असते. अशा पैशांची बॅंकेत एफ. डी करून पैसा कसा वाढवता येतो हे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पुढे म्युच्युअल फंडांसारख्या पर्यायांचा वापर करून संपत्ती निर्माण करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे हा त्यांच्या अर्थशिक्षणाचाच भाग आहे. लहान वयातच बचत आणि गुंतवणूकीची सवय लागलेले तरूण भविष्यात मोठ्या संपत्तीची निर्मिती करतील यात शंकाच नाही.
8. क्रेडीट कार्ड नको
क्रेडीट कार्डाचा वापर करणे ही एक फॅशनसुद्धा झाली आहे. हातात पैसा नसताना अनावश्यक खर्च करण्यासाठी क्रेडीट कार्टाचा पर्याय तरुणांना मोहात टाकतो. परंतु या जगात कोणतीही गोष्ट फुकट नसते. क्रेडीटने दिलेल्या पैशांवर बॅंक चांगलेच व्याज लावत आपला खिसा रिकामा करत असते. हे आर्थिक गणित आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
9. बॅंकींग समजून घ्या
विद्यार्थी दशेतच मुलांना बॅंका कशा काम करतात, बॅंकींग सिस्टिम काय आहे, तिथल्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत हे शिकवणे अत्यावश्यक आहे. खरेतर आता शाळांनीच हा विषय प्रात्यक्षिकांसहित मुलांना शिकवणे आवश्यक झाले आहे. बॅंकींग शिकता शिकताच मुलांना व्याजदर, महागाई, कर्ज, तारण, गुंतवणूक यासारख्या विषयांचे आकलन होईल. पालकांना आपल्या लहान सहान बॅंकींग व्यवहारात मुलांना किंवा तरुणांना सहभागी करून याविषयीचे प्राथमिक ज्ञान देता येईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या इतर विषयाइतकेच महत्त्व या विषयाला देणे गरजेचे आहे.
10. अर्थविषयक वाचनाची गोडी
अर्थविषयक, गुंतवणूकविषयक लेख, उत्त्म पुस्तके यांच्या वाचनाची सवय आणि गोडी मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. या क्षेत्रातल्या घडामोडी सातत्याने जाणून घेतल्या पाहिजेत. यामुळे आपले ज्ञान अद्ययावत तर होतेच पण आपल्या आर्थिक परिस्थितीचा अचूक ठोकताळा आपल्याला बांधता येतो. एरवी वाचनाचा कंटाळा असलेले पालकदेखील संपत्ती निर्मितीसाठी स्वत:बरोबरच आपल्या मुलांमध्ये याची आवड नक्कीच निर्माण करू शकतात. आयुष्यभर कठोर मेहनत करण्यापेक्षा आर्थिक ज्ञान मिळवून आनंदात जगणे केव्हाही श्रेयस्करच.
या अर्थमंत्रांना मुलांमध्ये लहान वयातच रूजवून भविष्यात आर्थिक विवंचनापासून दूर ठेवणे सोपे होईल. संपत्ती निर्मितीसाठी आता इतर काही गोष्टींबरोबरच अर्थसाक्षरतेचे बाळकडू अत्यावश्यक झाले आहे.