म्युच्युअल फंडात संयम ठेवून, दीर्घकाळ, शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे अल्प काळातील परताव्याकडे पाहून लगेच निष्कर्ष काढू नये. म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांची कामगिरी दरवर्षीच चमकदार राहील, अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. 3 ते 5 वर्षांच्या कालावधीनंतर त्यातील जोखीम कमी होत जाते…
अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नवे गुंतवणूकदारही या प्रकारात गुंतवणूक करताना दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण गेल्या वर्षभरापासून ज्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली आहे, त्यांना सध्या फायदा झालेला दिसत नाही. परंतु इतक्या कमी कालावधीत गुंतवणुकीचा आढावा घेऊन कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. म्युच्युअल फंडात संयम ठेवून, दीर्घकाळ, शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात, या गुंतवणूक प्रकारात आपल्या संयमाची बऱ्याचदा कसोटी लागते. यानिमित्ताने सर्वसामान्यांच्या मनातील काही प्रश्नांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न…
गेले वर्षभर आम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय. पण आम्हाला फायदा होताना दिसत नाही आणि काही योजनांमध्ये आमचे मुद्दलही कमी झाले आहे. त्याऐवजी आम्ही बॅंकेत पैसे ठेवले असते तर व्याज तरी मिळाले असते…
हे खरे आहे, की गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या शेअर बाजाराची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. मिड कॅप, स्मॉल कॅप योजनांचे मूल्यही कमी झाले आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांची कामगिरी दरवर्षीच चमकदार राहील, अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. तसेच इक्विटी योजनांच्या परताव्याची तुलना बॅंक ठेवींवरील व्याजाशी करणेही योग्य नाही. याचे कारण शेअर बाजार कधीच ठराविक गतीने वाटचाल करून निश्चित परताव्याची हमी देत नाही. तो कायमच वर-खाली होत राहणार, याची तयारी ठेवली पाहिजे. 3 ते 5 वर्षांच्या कालावधीनंतर त्यातील जोखीम कमी होत जाते. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी दरवर्षी ठराविक परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेऊ नये. महत्त्वाचे म्हणजे अल्प काळातील परताव्याकडे पाहून लगेच निष्कर्ष काढू नये.