‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते,’ हा ‘डिस्क्‍लेमर’ वाचला की बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात.  या ‘डिस्क्‍लेमर’चा खरा अर्थ समजावून घेण्याची वेळ आली आहे.

जोखमीचा उल्लेख कशासाठी?
‘सेबी’च्या कार्यकाळाअगोदर म्युच्युअल फंडांना या ‘डिस्क्‍लेमर’चा उल्लेख करणे अनिवार्य नव्हते. त्यामुळे काही मध्यस्थ चुकीची माहिती देऊन योजनांची विक्री करायचे, ज्याला ‘मिस सेलिंग’ असे म्हणतात. काही म्युच्युअल फंड (मार्केटिंग) मेंबर्ससुद्धा त्यांची टार्गेट्‌स पूर्ण होण्यासाठी चुकीच्या पद्धतीने योजना विकायचे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान व्हायचे. हे लक्षात घेऊन ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांना त्यांच्या प्रत्येक योजनेमध्ये आणि प्रत्येक माध्यमांमध्ये जोखमीचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल; त्याचप्रमाणे परतावा आणि मुद्दलाची खात्री देता येणार नाही, असे नमूद करणे बंधनकारक केले. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे, की म्युच्युअल फंडाव्यतिरिक्त इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये जोखमीचा असा उल्लेख अनिवार्य नाही. बांधकाम व्यावसायिकांना आपल्या जाहिरातींमध्ये, ‘संबंधित प्रकल्प ठराविक वेळेत बांधून पूर्ण होणे हे बाजारातील विविध जोखमींवर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये घर घेण्यापूर्वी किंवा पैसे गुंतवण्यापूर्वी अशा जोखमीचा अभ्यास करा,’ असा ‘डिस्क्‍लेमर’ देण्याचे बंधन दिसत नाही. सोने-चांदीसाठीदेखील असेच म्हणता येईल. बॅंका, पतसंस्था, चिटफंड, भिशी यांमध्येसुद्धा अशी जोखीम लिहिलेली नसते. असे असूनसुद्धा अनेक जण त्यात गुंतवणूक करतात. काही बॅंका, पतसंस्था, चिटफंड, भिशी, बांधकाम प्रकल्प बंद पडून गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले आपण पाहिलेले आहे.

जोखीम कशाची असते?
म्युच्युअल फंडांमध्ये जोखीम असते ती बाजाराच्या अस्थिरतेची, अर्थात ‘व्होलाटॅलिटी’ची. समजा तुम्ही शेअर बाजाराशी निगडित असणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतविले आणि शेअर बाजार खाली गेला, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते. परंतु, हे बऱ्याचदा तात्पुरते असते. कारण नंतर शेअर बाजार वर गेला, की तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडाकडून किंवा कंपनीकडून फसविले जाण्याची जोखीम नसते.

जोखीम कशी कमी करता येते?
म्युच्युअल फंडात कोणती जोखीम असते, हे लक्षात आले असेल, तर ती जोखीम कमी करता येऊ शकते का, याचा विचार केला पाहिजे. पुढील काही गोष्टींनी तुमची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
एखाद्या विभागाशी (सेक्‍टर) निगडित असणाऱ्या योजनेपेक्षा ‘डायव्हर्सिफाइड’ अर्थात विभागांमध्ये विविधता असणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करावी.
एकाच वेळी एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा ती टप्प्याटप्प्याने करावी. यासाठी ‘एसआयपी’ आणि ‘एसटीपी’ असे पर्याय उपलब्ध आहेत.
बॅलन्स्ड फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास थोडी जोखीम कमी होऊ शकते, कारण त्यामध्ये शेअर (इक्विटी) आणि रोखे (डेट) यांचे मिश्रण असते.
 जोखीम नगण्य हवी असेल (किंवा अजिबात नको असेल), तर लिक्विड योजना किंवा आर्बिट्राज योजनांमध्ये गुंतवणूक करता येते.
रोखे विभागामधील जोखीम कमी करायची असेल, तर निश्‍चित मुदतपूर्ती अर्थात एफएमपी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. त्यामध्येसुद्धा अशा योजना निवडाव्यात, की ज्यामधील गुंतवणुकीचे सर्व पेपर ‘एएए’ असे सर्वोच्च मानांकनाचे असतील.

अभिप्राय द्या!