बीटा म्हणजे काय? 
“बीटा’ हा म्युच्युअल फंडातील लाभ-जोखीम यांचे गुणोत्तर मांडतो. उदाहरणार्थ एखाद्या फंडाचा बीटा 1.50 असेल, तर त्याचा अर्थ होतो, की निर्देशांक (सेन्सेक्‍स, निफ्टी) एक टक्‍क्‍याने वर-खाली झाला, तर संबंधित फंडात 1.50 टक्‍क्‍यांची हालचाल होते. म्हणजेच निर्देशांक 10 टक्‍क्‍यांनी वाढला, तर हा फंड 15 टक्‍क्‍यांनी वाढला पाहिजे. तसेच, निर्देशांक 10 टक्के कोसळला, तर हा फंड जास्तीतजास्त 15 टक्के कोसळला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ असा होतो, की अधिक “बीटा’ असलेला फंड तेजीच्या काळात निर्देशांकाच्या तुलनेत खूप जास्त परतावा देऊ शकतो. परंतु, मंदीच्या काळात तो निर्देशांकाच्या तुलनेत वेगाने कोसळतो. इंडेक्‍स फंडांचा “बीटा’ मात्र कायम 1 असणे अपेक्षित असते, कारण त्यातील चढ-उतार हे निर्देशांकातील चढ-उतारांएवढेच असतात. 
 
अल्फा म्हणजे काय? 
निवडलेल्या निर्देशांकाच्या तुलनेत एखादा फंड कशी कामगिरी करीत आहे, हे “अल्फा’ आपल्याला सांगतो. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाने “निफ्टी’ या निर्देशांकाला डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक करायचे ठरविल्यास साहजिकच त्या फंडाचा परतावा हा “निफ्टी’च्या परताव्याएवढा असणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षभरात “निफ्टी’ने 15 टक्के परतावा दिला आहे आणि संबंधित फंडाने 17 टक्के परतावा दिला असेल, तर त्या फंडाचा अल्फा 2 आहे. या उलट त्या फंडाचा परतावा 12 टक्के असेल, तर त्याचा अल्फा उणे 3 येईल. म्हणजेच अल्फा = फंडाचा परतावा (वजा) निर्देशांकाचा परतावा, असे सूत्र आपण मांडू शकतो. फंड व्यवस्थापकाच्या योग्य किंवा चुकीच्या निर्णयामुळे फंडाची कामगिरी निर्देशांकाच्या तुलनेत कशी चांगली किंवा खराब झाली आहे, हे “अल्फा’ सांगतो. इंडेक्‍स फंडांचा “अल्फा’ मात्र शून्य असणे अपेक्षित असते; कारण त्यांची गुंतवणूक तंतोतंतपणे निर्देशांकासारखीच होत असते. त्यामुळे त्यांचा परतावा निर्देशांकाच्या परताव्याएवढाच असणे अपेक्षित असते. 
 
जाणकार काय करतात? 
जाणकार गुंतवणूकदार “अल्फा’ आणि “बीटा’ यांचा एकत्रित अभ्यास करून निर्णय घेतात. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाचा बीटा 2 आहे. याचाच अर्थ ज्या निर्देशांकावर आधारित हा फंड आहे, त्या निर्देशांकाने एखाद्या वर्षात 10 टक्के परतावा दिला असल्यास त्या फंडाने 20 टक्के परतावा (10 टक्‍क्‍यांच्या दुप्पट) देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र त्या फंडाने 18 टक्के परतावा दिला असल्यास त्याचा अल्फा उणे 2 एवढा येतो (20 वजा 18). म्हणजे वरवर पाहता त्या फंडाचा 18 टक्के हा परतावा निर्देशांकाच्या 10 टक्के परताव्यापेक्षा चांगला वाटत असला, तरी तो फंड गुंतवणुकीची जी जोखीम घेत आहे, त्यानुसार त्याने 20 टक्के परतावा देणे अपेक्षित होते. म्हणूनच त्याचा अल्फा उणे दिसत आहे. 
थोडक्‍यात, म्युच्युअल फंडाने दिलेल्या परताव्याचा केवळ आकडा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेण्याऐवजी अल्फा आणि बीटा याच्या मदतीने त्या फंडाचा अधिक तपशीलवार अभ्यास करणे योग्य ठरते. तसेच, तज्ज्ञ व अनुभवी सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते. 

This Post Has 2 Comments

 1. विलास

  रोज शेअर खरेदी विक्री केल्यास कसा फायदा होतो

  1. Pradeep Joshi

   Purchase at lower rates & sell at higher rates gives you the benifit of the value of the differance in the cost.
   which is your profit.

   Pradeep joshi

अभिप्राय द्या!