म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपयांवर पोचणार आहे. मोठ्या प्रमाणावर क्रयशक्ती वाढल्यामुळे, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असल्यामुळे आणि गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फडातील गुंतवणूकीकडे वाढत चालल्यामुळे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत ही वाढ अपेक्षित असल्याचे मत एचडीएफसी बॅंकेचे चेअरमन दिपक पारेख यांनी व्यक्त केले आहे. जागतिक पातळीवरील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीकडे बघता भारतात अजूनही हे प्रमाण बरेच कमी आहे. भारतात म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे प्रमाण जीडीपीच्या तुलनेत 11 टक्के इतकेच आहे. तर जागतिक पातळीवर याचे प्रमाण सरासरी 62 टक्के इतके आहे. त्यामुळे भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूकीत वाढ होण्यासाठी मोठा वाव उपलब्ध असल्याचे मत दिपक पारेख यांनी  व्यक्त केले आहे.
शेअर बाजारातल्या चढउताराच्या पार्श्वभूमीवरसुद्धा इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजनामध्ये गुंतवणूक ओघ सुरूच आहे. जुलै महिन्यात इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजनामध्ये 8,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. जून महिन्यात हाच आकडा 8,794 कोटी रुपये इतका होता. यावर्षी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत आहेत विशेषत: स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. तरीसुद्धा इक्विटी फंड प्रकारामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे.

अभिप्राय द्या!