इंटरनेट बॅंकिंग
इंटरनेट बॅंकिंग वापरताना बऱ्याचदा आपण ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेचा विचार करत नाही. इंटरनेट बॅंकिंगची सुरक्षितता कशी तपासावी किंवा आपला व्यवहार कसा सुरक्षित ठेवावा याची माहिती असणं गरजेचं आहे. पुरेशी काळजी न घेतल्यास ऑनलाइन व्यवहार करताना आर्थिक फटकाही आपल्याला बसू शकतो.
इंटरनेट बॅंकिंग वापरताना खालील गोष्टींची काळजी घेतल्यास आपला व्यवहार आपण सुरक्षित ठेवू शकतो :
– आपण वापरत असलेला वेब ब्राऊझर सुरक्षित आहे का ते तपासावं.
– शक्‍यतो वेब ब्राऊझरचं अपडेटेड व्हर्जन वापरावं- ते अधिक सुरक्षित असतं.
– आपला इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा.
– आपलं स्वतःचं नाव, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचं नाव यांनी बनलेला पासवर्ड वापरणं टाळावं.
– आपल्या कॉंप्युटर/लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस वापरावा.
– इंटरनेट बॅंकिंग लॉगिन केल्यानंतर यापूर्वी लॉगिन कधी करण्यात आलं होतं त्याची माहिती दाखवण्यात येते. पूर्वीचं लॉगिन आपल्याद्वारेच करण्यात आलं होतं याची खात्री करून घ्यावी.
– इंटरनेट कॅफे, पब्लिक वायफायवरून इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगिन करू नये.
– “टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन’चा वापर करावा.
– आपलं काम झाल्यानंतर इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगआऊट करावं.
– कोणत्याही वेब ब्राऊझरला आपल्या इंटरनेट बॅंकिंगचं युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह करण्याची परवानगी देऊ नये.

मोबाईल बॅंकिंग
सध्या जवळपास प्रत्येक बॅंकेचं मोबाईल बॅंकिंग ऍप आहे. आपल्या खात्यातली शिल्लक रक्कम तपासणं, एखाद्याला पैसे पाठवणं यांसारख्या गोष्टी या ऍपद्वारे करता येतात. त्यामुळं मोबाईल बॅंकिंगचा वापर करताना जे आपल्या बॅंकेचं अधिकृत ऍप आहे तेच फक्त वापरावं. आपण वापरत असलेलं ऍप अधिकृत आहे का, हे बॅंकेकडून तपासून घ्यावं.

या गोष्टींसोबतच इतर प्रकारेदेखील ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. आजकाल मोबाईलवरूनदेखील अनेक जण इंटरनेट बॅंकिंग वापरतात. ऑनलाइन शॉपिंग, सिनेमा यांच्यासाठी खर्च करण्यापासून बस, रेल्वे, विमान यांची तिकिटंदेखील मोबाईल ऍप्सद्वारे काढण्यास अनेक जण पसंत करतात. ही ऍप्स वापरतानादेखील काळजी घेतली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास आपण वापरत असलेला स्मार्टफोन, त्यामध्ये असलेली ऍप्लिकेशन्स यांच्याद्वारेदेखील आपल्या बॅंक खात्याबद्दलची महत्त्वाची माहिती दुसऱ्याला मिळवता येऊ शकते. आपल्या एटीएम कार्डची माहिती सेव्ह करण्याची परवानगी शक्‍यतो कोणत्याही ऍपला देऊ नये. तसंच एसएमएस किंवा ई-मेलद्वारे येणाऱ्या अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करण्याचा मोह टाळावा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे “आपल्या बॅंकेमधून बोलतोय, आपल्या खात्याबाबत; तसंच डेबिट क्रेडिट कार्डची माहिती द्या,’ असं सांगणारा फोन आल्यास माहिती देऊ नये.

अभिप्राय द्या!