देशातील सहाव्या क्रमांकाची आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी युटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (एएमसी) लवकरच आपला आयपीओ बाजारात दाखल करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युटीआय 5000 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याचा विचार करत आहे.
युटीआय म्युच्युअल फंडामध्ये टी रो. प्राइस या अमेरिकन गुंतवणूक संस्थेचा 26 टक्के हिस्सा आहे. तर, भारतीय जीवन बीमा महामंडळ (एलआयसी), भारतीय स्टेट बँक (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ बडोदा (बीओबी) यांचा यूटीआय एएमसीमध्ये प्रत्येकी 18.25% पर्यंत हिस्सेदारी आहे. मात्र, सेबीच्या नवीन नियमानुसार कोणत्याही एएमसीचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त एएमसीमध्ये 10 टक्क्यांच्यावर शेअर्स असता कामा नये. एलआयसी,  एसबीआय, पीएनबी आणि बीओबी या कंपन्यांचे स्वतंत्र म्युच्युअल फंड कंपन्या असल्याने त्यांना आपली मालकी कमी करणे अपेक्षित होते मात्र तास कोणताही निर्णय न झाल्याने टी रो. प्राइस कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, अर्थ मंत्रालयाने यात लक्ष घालत वरील चारही कंपन्यांची मार्च 2019 पर्यंत मालकी कमी करण्याचे आश्वासन दिल्याने टी रो. प्राइस कंपनीने उच्च न्यायालयातील आपली याचिका माघारी घेतली आहे. तसेच, टी रो. प्राइस देखील युटीआय एएमसीमधील आपली मालकी कमी करणार आहे. त्यानुसार, एकूण 40 टक्क्यांची मालकी कमी होऊन ती सर्वसामान्य गुंतवणूकदार, गुंतवणूक संस्थांना खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे ही गुंतवणूक 5000 कोटींची असणार आहे. जी आयपीओच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu