‘मिस-सेलिंग’ म्हणजे नक्की काय?
एखाद्या योजनेची विक्री करताना त्या योजनेची चांगली बाजू रंगवून सांगणे, धोके समजावून न सांगणे व ती योजना खरेदीदारासाठी योग्य आहे की नाही ते तपासून न पाहता केवळ कमिशन जास्त मिळविण्यासाठी अथवा “टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी एखादी योजना ग्राहकाच्या गळ्यात मारणे, याला मिस-सेलिंग’ असे म्हणता येईल.
विमा व म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या विक्रीमध्ये होणारे ‘मिस-सेलिंग’चे काही प्रकार पुढीलप्रमाणे –
1) बॅंकेत मुदत ठेव ठेवण्यास आलेल्या ग्राहकाला पुरेशी माहिती न देता ‘सिंगल प्रिमियम’ विमा पॉलिसी विकणे.
2) गुंतवणूक व विमा एकत्र करून, त्यावर सुरवातीला व नंतर दरवर्षी अनेक चार्जेस लावणे.
3) लॉकर अथवा गृहकर्ज घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला विमा अथवा म्युच्युअल फंडाची योजना घेण्यास भाग पाडणे.
4) निवृत्तीनंतर ही दीर्घकाळापर्यंत मोठे हप्ते भरावे लागतील, अशी विमा योजना गळ्यात मारणे.
5) बॅंकेत ‘पीपीएफ’सारखे सुरक्षित खाते उघडण्यासाठी आलेल्या ग्राहकाला ‘ईएलएसएस’सारख्या 100 टक्के गुंतवणूक शेअर्समध्ये करणाऱ्या योजनेत, जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगणे.
6) जास्ती परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिक मिड कॅप, स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करण्यास सांगणे.
7) कमिशन अधिक मिळते म्हणून ‘युलीप’ व म्युच्युअल फंडाच्या ‘एनएफओ’; तसेच दीर्घ मुदतीच्या ‘क्लोज एंडेड’ योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणे.
‘मिस सेलिंग’पासून वाचायचे असल्यास, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही योजना खरेदी करताना, त्या योजनेचे फायदे-तोटे, धोके व ती योजना आपल्याला खरोखरच गरजेची आहे का, हे तपासून पाहणे अत्यावश्यक असते. ज्याच्याकडून आपण एखादी योजना खरेदी करतो, त्याला योजनेच्या विक्रीमध्ये ‘रस’ असल्याने तो योजनेची दुसरी बाजू अथवा धोके व तोटे सांगणार नाही, असे गृहीत धरूनच ‘दुसरी बाजू’ ग्राहकाला स्वतःलाच समजून घ्यावी लागते व ते शक्य नसल्यास आपल्या विश्वासू आर्थिक सल्लागाराचे मत घेणे हितावह ठरते.
विमा व म्युच्युअल फंड व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल आहे, अशावेळी स्वच्छ व पारदर्शक व्यवहार करून ग्राहकहिताला प्राधान्य दिल्यास या व्यवसायांची वाढ झपाट्याने होईल, यात शंका नाही.