घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आणि चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी मसाला बॉण्ड्सवर विशेष लक्ष देणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. परंतु, मसाला बॉण्ड किंवा कर्जरोखे म्हणजे काय हे सर्वसामान्य नागरिकाला माहिती नसल्यामुळे त्याचा देशाचे चलन असलेल्या रुपयावर कसा परिणाम होतो हे समजण्यास अवघड जाते. म्हणूनच जाणून घेऊयात, मसाला बॉण्ड म्हणजे नक् काय ते.
जर एखाद्या भारतीय कंपनीला परदेशात गुंतवणुकीसाठी पैसे उभा करायचे असतील तर त्या कंपनीला आपले बॉण्ड्स डॉलरच्या चलनात इश्यू करावे लागत होते. त्यामुळे साहजिकच डॉलरच्या कमी अधिक किंमतीचा फटका भारतीय कंपन्यांना बसत असे. मात्र, ‘मसाला बॉण्ड’मुळे या कंपन्यांना रुपयात कर्जरोखे जारी करणे शक्य झाले. यामुळे भारतीय कंपन्याची जोखीम कमी होऊन उलटपक्षी परकी गुंतवणूकदारांची जोखीम वाढली आहे.
‘मसाला’ हा एक भारतीयांच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना मिळावी म्हणून इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) या शब्दाचा वापर केला.
जागतिक बँकेचा पाठिंबा असलेल्या ‘इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने (आयएफसीने)’ नोव्हेंबर 2014 मध्ये भारतातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी 1,000 कोटी उभा करण्यासाठी पहिले ‘मसाला बाँड’ जारी केली होते.
जुलै 2016 मध्ये मसाला बॉण्ड्समधून 3,000 कोटी रुपये उभारणारी एचडीएफसी ही पहिली भारतीय कंपनी बनली आहे.
यानंतर, ऑगस्ट 2016 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील ‘एनटीपीसी’ने 2,000 कोटी रुपयांचे पहिले कॉर्पोरेट ग्रीन मसाला बॉण्ड्स जारी केले आहे. ते केवळ लंडन स्टॉक एक्सचेंजवर (एलएसई) कार्यरत आहे.

अभिप्राय द्या!