गुंतवणूक ही निश्चितच एक दीर्घकालीन कृती असते. यामधील टप्पे आपल्याला उद्दिष्टांकडे घेऊन जातात. शक्यतो एक विशिष्ट उद्दिष्ट मनात ठेवून त्याप्रकारे गुंतवणूक करण्यास सुरुवात व्हायला हवी. त्याखेरीज गुंतवणुकीचा क्षमता आणि जोखीम पेलण्याची ताकद यांच्यानुसारही तुम्ही गुंतवणूक निर्णय घेऊ शकता. हे घटक निश्चितझाले कि योग्य पर्यायांची निवड करावी.
दूरदृष्टी ठेवून मालमत्ता विभाजन करणे ही आर्थिक सक्षमीकरणाची पहिली पायरी असते. मालमत्तेचे योग्यप्रकारे विभाजन न केल्यास इक्विटीसारख्या अगदी उत्तम पर्यायदेखील अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. आपल्या संपत्तीस्रोतांचे विविध प्रकारांमध्ये अशाप्रकारे वाटप करायचे की, ज्यामध्ये जोखीम आणि लाभ यांचा उत्तम समतोल साधला जाईल आणि परिणामी अपेक्षित परतावा मिळेल. मालमत्तेचे इक्विटी, डेट आणि रोकड (कॅश) हे साधारण तीन प्रकार असतात. गुंतवणूक पोर्टफोलिओची उभारणी करताना उद्दिष्ट, जोखीम पत्करण्याची ताकद आणि गुंतवणूक कालावधी यानुसार या मालमत्ता प्रकारांत कमीअधिक गुंतवणूक करता येते.
गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये कोणकोणत्या मालमत्ता प्रकारांचे वर्गीकरण असावे, याचा निर्णय हा तुमचे उद्दिष्ट, व ध्येय काय आहे? त्यावरून ठरते. अल्पकालीन उद्दिष्टासाठी अशा मालमत्तेची गरज लागते, जी लवचिक (लिक्विड) आहे आणि ज्यामधून मध्यम, पुरेशा प्रमाणात परतावा मिळेल. त्या उलट, दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इक्विटीसारख्या अधिक जोखमीच्या मालमत्ता प्रकारांची निवड करणे इष्ट असते, कारण ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. परंतु यात मालमत्ता प्रकाराची निवड आणि त्यानंतर त्यामध्ये पैशांचे विभाजन करताना गुंतवणूकदाराचे वय हा मुद्दा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो.
वय जस-जसे वाढत जाते, तस-तसा गुंतवणूकदाराच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेत बदल होत जातो. व्यक्तीचे वय जसे वाढते, तसे जीवनाचे प्राधान्यक्रम आणि गरजादेखील बदलत जातात. मालमत्तेचे वाटप अधिक जोखमीच्या प्रकारांपासून बदलून अधिक सुरक्षित पर्यायांकडे होत जाते. सरतेशेवटी, व्यक्ती जशी निवृत्तीकडे झुकते, तेव्हा तिचा कल अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यापेक्षा भांडवल सुरक्षित राखण्याकडेच असतो.
वयानुरूप पोर्टफोलिओ
तुमचे सध्याचे वय १००मधून वजा करा आणि जे उत्तर येईल तेवढी गुंतवणूक तुम्ही इक्विटीमध्ये करायला हवी हे लक्षात ठेवा. समजा, तुमचे वय २५ वर्षे आहे, तर तुम्ही एकूण उत्पन्नापैकी ७५% रक्कम (१००-२५) इक्विटीमध्ये बिनधास्त गुंतवू शकता आणि उरलेली रक्कम डेटमध्ये गुंतवा.
म्युच्युअल फंडांच्या बाबतीत ही पद्धत सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर प्लॅनच्या (एसटीपी) माध्यमातून अनुसरता येते. (तुम्ही २५ वर्षांचे आहात असे गृहीत धरल्यास) इथे, सुरुवातीला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि डेट फंड ७५:२५ या प्रमाणात विभागलेले असतात. जसजसे वय वाढत जाईल, तुम्ही इक्विटीमधून डेटकडे एसटीपी करू शकता. फंड व्यवस्थापक इक्विटीमधून युनिट्स काढून घेईल आणि त्या रकमेतून डेट फंडाचे युनिट विकत घेईल. तुम्ही निवृत्त होईपर्यंत तुमचा संपूर्ण निधी डेट फंडात जमा झालेला असेल. असे केल्याने तुम्ही जेव्हा निवृत्त व्हाल, त्यावेळी बाजारपेठेतील अस्थिरतेचा आणि उलाढालींचा परिणाम होऊन तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होण्यापासून संरक्षण मिळेल.
व यासाठी आपण गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेवूनच असे निर्णय घेणे सोयीचे होईल .