अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड हा ‘ईएलएसएस फंड’ गटात सर्वाधिक मालमत्ता आणि गुंतवणूकदारांना चांगला ‘एसआयपी’ परतावा दिलेला फंड आहे.

२० सप्टेंबर २०१८च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार एका वर्षांच्या एसआयपी परताव्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर, पाच वर्षांच्या एसआयपी परताव्याच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला हा फंड आहे.

या फंडातील गुंतवणूक वैयक्तिक करदात्यांसाठी आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली मिळणाऱ्या कर वजावटीस पात्र असून फंडाच्या सुरुवातीपासून मागील १०५ महिने दरमहा ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ५.२५ लाख गुंतवणुकीवर वार्षिक १९.३२ टक्के नफा मिळाला आहे. २० सप्टेंबर २०१८च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार या गुंतवणुकीचे बाजारमूल्य १२.५७ लाख रुपये होते. ३१ ऑगस्ट रोजी फंडाची मालमत्ता १८,७५२ कोटी रुपये होती.

फंडाची गुंतवणूक लार्ज कॅप केंद्रित आहे. ३१ ऑगस्टच्या गुंतवणूक विवरणानुसार फंडाच्या गुंतवणुकीत ७०.०५ टक्के लार्ज कॅप, २५.६९ टक्के मिड कॅप, १.७४ टक्के स्मॉल कॅप आणि २.५२ अन्य गुंतवणुका आहेत.

आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली मिळणाऱ्या कर वाजावटपात्र गुंतवणुका दीर्घकालीन असाव्यात जेणे करून मिळणाऱ्या मोठय़ा रकमेवर निवृत्तीपश्चात उदरनिर्वाह किंवा दीर्घकालीन वित्तीय ध्येयांची पूर्तता करता येईल. आर्थिक नियोजनात कर नियोजनाकडे लक्ष देणे गरजेचे असते. आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली वजावट पात्रतेसाठी २० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. करदात्यांची अर्थजाणीव बेताची असल्याने शेअर बाजारात गुंतवणूक नको या सबबीखाली निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांना पसंती दिली जाते. निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांतून बचतीची बेरीज होते. कर वजावटीसाठी केलेल्या बचतीचा गुणाकार करायचा असेल तर ‘ईएलएसएस’ला पर्याय नाही.

दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडाचा गुंतवणुकीत समावेश करावा.

अभिप्राय द्या!