ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, पण
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 
 
१) इक्विटी या ॲसेट क्‍लासमध्ये असे चढ-उतार होणे हे गृहितच धरावे लागते. देशातील आणि परदेशातील अनेक घडामोडींवर (मॅक्रो फॅक्‍टर) आणि कंपन्यांच्या कामगिरीवर शेअर बाजार अवलंबून असतो. त्यामुळे अनुकूल-प्रतिकूल अशा सर्व घटकांचा परिणाम होत राहतो. 
 
२) जर अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असेल, तर शेअर बाजारावर त्याचा अनुकूल परिणाम होतच असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग पुढील काही वर्षांसाठी किमान ७ टक्के (वार्षिक वाढ) एवढा तरी राहील, याविषयी सर्व आर्थिक संस्थांमध्ये एकमत आहे. यात जर आपण ५ टक्के महागाई वाढीचा दर मिळविला तर सुमारे १२ टक्के या दराने शेअर बाजाराचा निर्देशांक वाढावा, अशी अपेक्षा ठेवता येईल.
 
३) यापूर्वी जेव्हा जेव्हा शेअर बाजारात १४ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट झाली, तेव्हा पुढील (सरासरी) ६६ दिवसांत ती घट भरून निघाली, असे दिसून आले आहे. २००६ मध्ये झालेली ३० टक्के घट पुढील चार महिन्यांत भरून निघाली होती. २००४ मध्ये झालेली २७ टक्के घट पुढील सहा महिन्यांत भरून निघाली होती. 
 
४) म्युच्युअल फंडांच्या अनेक प्रकारच्या इक्विटी योजना असतात. यातील कंपन्यांची निवड करताना अनेक चाळण्या लावून केली जात असल्याने आणि एका योजनेत अनेक कंपन्यांचा समावेश असल्याने चांगल्या म्युच्युअल फंड योजनेतील पैसे कमी होऊ शकतात; पण बुडण्याची शक्‍यता नसते.
 
५) इक्विटी प्रकारात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप असे वैविध्य असते. लार्ज कॅप प्रकारातील योजनांची जोखीम मिड कॅप योजनेपेक्षा आणि मिड कॅप कंपन्यांची जोखीम स्मॉल कॅप योजनेपेक्षा तुलनेने कमी असते. अर्थात, त्यांच्या परताव्यातही तसा फरक पडतो. त्यामुळे जोखीम कमी करायची असेल तर लार्ज कॅप योजनेतील गुंतवणूक वाढवायला हरकत नाही. 
 
६) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चालू ‘एसआयपी’ अजिबात बंद करू नयेत. असे करण्याने कमी ‘एनएव्ही’ला मिळू शकणारी युनिट्‌स आपल्याला मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, की ‘बाय लो, सेल हाय’ या तत्त्वानेच फायदा होतो अणि त्यासाठी ‘एसआयपी’ हे आदर्श साधन आहे.
 
७) ‘एसआयपी’ करणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांना तर शेअर बाजारातील पडझड ही पर्वणी वाटली पाहिजे. ज्यांची आर्थिक उद्दिष्टे १० वर्षे किंवा अधिक काळाची आहेत, त्यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅप योजनेत जरूर ‘एसआयपी’ करावे आणि ते चालूच ठेवावे.
 
८) ज्यांना आता एकरकमी गुंतवणूक करायची आहे, त्यांनी ती ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’चा (एसटीपी) उपयोग करून पुढील ६ ते १२ महिन्यांत लिक्विड फंडातून इक्विटी योजनेत करायला हरकत नाही. 
 
कोणतेही सरकार आले तरीसुद्धा भारतीय आर्थिक व्यवस्थेची पुढील अनेक वर्षे ही प्रगतिपथावरील आहेत, असा विश्‍वास बाळगावा. दीर्घकाळाचे उद्दिष्ट ठेऊन पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यात आपले हित आहे. शेअर बाजारातील सध्यासारखी ‘करेक्‍शन’ ही संधी समजायला हरकत नाही. ‘जेव्हा इतर लोक घाबरलेले असतात, तेव्हा तुम्ही लोभी बना…’ प्रसिद्ध गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांचे हे विधान काय लक्षात ठेवा.व घाबरून जाऊ नका !!!

अभिप्राय द्या!