म्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. ते पहा !!

१) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे – म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी निगडित योजना नव्हेत. त्यांच्या ‘लिक्विड’, ‘डेट’ योजनासुद्धा असतात, ज्यांचा शेअर बाजाराशी संबंध नसतो.

२) डी-मॅट खाते – म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ‘डी-मॅट’ खाते आवश्‍यक नसते; परंतु तसा पर्याय उपलब्ध असतो. गुंतवणूकदार त्यांची म्युच्युअल फंड युनिट्‌स ‘डी-मॅट’ खात्यामध्ये ठेवू शकतात. डी-मॅट नसले तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते.

३) केवायसी अर्थात नो युवर क्‍लायंट – ‘केवायसी’ची प्रक्रिया एकदाच करावी लागते. ती सर्व म्युच्युअल फंडांना लागू पडते आणि त्यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही.

४) म्युच्युअल फंड योजना बंद पडत नाहीत – म्युच्युअल फंड योजना सहजपणे बंद होत नाहीत. एखाद्या म्युच्युअल फंडाला (ज्यांना ‘स्पॉन्सरर’ असे म्हणतात) जर बाहेर पडायचे असेल, तर त्यांना ‘सेबी’ला मान्य असणारा दुसरा ‘स्पॉन्सरर’ शोधावा लागतो आणि सर्व योजना रीतसर त्यांच्याकडे सोपवाव्या लागतात. याशिवाय गुंतवणूकदारांना जर हा बदल (नवा स्पॉन्सरर) मान्य नसेल, तर त्यांना निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार (एनएव्ही) संबंधित योजनेतून त्यांचे पैसे काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

५) गुंतवणूकदारांचे हक्क – म्युच्युअल फंडांना गुंतवणूकदारांचे प्रत्येक काम किंवा विनंती पूर्ण करण्यासाठी ठराविक कालावधीचे बंधन असते. त्या कालावधीत त्याची पूर्तता सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना करावीच लागते.

६) ‘फोलिओ नंबर’ चालू राहतो – संपूर्ण गुंतवणूक काढून घेतल्यानंतरसुद्धा गुंतवणूकदाराचा संबंधित योजनेचा ‘फोलिओ नंबर’ चालू राहतो, त्यामुळे नंतर पुन्हा गुंतवणूक करावयाची असेल, तर त्याच फोलिओअंतर्गत गुंतवणूक करणे सोपे होते.

७) निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) – ‘एनएव्ही’ कमी असलेली योजना म्हणजे ‘स्वस्त’ आणि जास्त असलेली योजना म्हणजे ‘महाग’ असा गुंतवणूकदारांचा गैरसमज असतो. म्हणूनच एखाद्या योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्याकडे न पाहता योजनेची मागील तीन-पाच वर्षांची कामगिरी, फंड हाउस, फंड व्यवस्थापक, खर्चाचे प्रमाण, एकूण निधी आदी गोष्टी तपासणे जास्त महत्त्वाचे असते.

८) मुद्दल किंवा परताव्याची खात्री नसते – बॅंकेमधील मुदत ठेवींसारखी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एका सरळ रेषेमध्ये वाढत नाही, त्यामध्ये चढ-उतार येतात. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये घट झाली, तर घाबरून ती चुकीच्या वेळेला काढून न घेता दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे योग्य ठरते.

अभिप्राय द्या!