भारतामध्ये अधिकांश लोक प्राप्तिकर वाचविण्यासाठी आयुर्विमा अर्थात इन्शुरन्स घेतात; परंतु प्राप्तिकर लागू होत नसेल किंवा तो वाचविण्यासाठीची इतर गुंतवणूक कमाल पातळीवर गेली असेल, तर आयुर्विमा घ्यायचा नाही का? त्याचप्रमाणे प्राप्तिकर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे इतर आकर्षक पर्याय उपलब्ध असताना गरज नसली तरी इन्शुरन्स घ्यायचा का? दोन्हीचे उत्तर “नाही’ असेच येते. आयुर्विमा ही एक स्वतंत्र संकल्पना आहे आणि त्याच्याकडे स्वतंत्ररीत्या बघितले पाहिजे. गुंतवणुकीची प्रथम पायरी म्हणजे प्राप्तिकर बचत करणे. प्राप्तिकर बचत करण्यासाठी जे काही पर्याय उपलब्ध आहेत, त्या सर्वांची तुलना केली तर इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम (इएलएसएस) योजनांचा क्रमांक सर्वांत वरचा लागेल. काय आहेत या योजना आणि त्याचे फायदे, थोडक्‍यात समजावून घेऊया.
 
“इएलएसएस’ या म्युच्युअल फंडांच्या सतत खुल्या असणाऱ्या योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही केव्हाही गुंतवणूक करू शकता. कमीत कमी 500 रुपये आणि कमाल गुंतवणुकीवर बंधन नाही. तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. प्रवेशभार आणि बहिर्गमनभार नाही. या योजनांमधील गुंतवणूक ही प्रामुख्याने शेअर बाजारामध्ये केली जाते. इएलएसएस या विभागात सध्या अनेक योजना उपलब्ध आहेत. 
 
योजनांचे फायदे:
1) अशा योजनेमध्ये गुंतवणूक करून कलम 80 सीअंतर्गत प्राप्तिकर वाचविता येतो. कमाल गुंतवणूक दरवर्षी दीड लाख रुपये आहे, जी इतर पर्यायांसहीत आहे. तुम्ही जर 30 टक्के या कमाल करपातळीत येत असाल, तर दरवर्षी 45 हजार रुपयांचा प्राप्तिकर वाचवू शकता.
 
2) या योजना इतर पर्यायांच्या तुलनेत सर्वांत कमी “लॉक इन पीरियड’ असलेल्या आहेत, जो फक्त तीन वर्षे आहे.
 
3) तिहेरी फायदा : या योजना “ईईई’ विभागात म्हणजेच तीनही वेळा करबचत करतात. गुंतवणूक केल्याने प्राप्तिकर वाचतो, त्यावरील लाभांश करमुक्त आहेत आणि अशा योजनेमधून पैसे काढल्यावर त्यावरील नफ्यावरसुद्धा कोणताही कर द्यावा लागत नाही.
 
4) आकर्षक परतावा : सर्वांत खराब कामगिरी करणाऱ्या योजनेने मागील काही वर्षांत आठ टक्के, तर सर्वांत चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेने 26 टक्के इतका परतावा दिला आहे. म्हणजेच साधारण (ऍव्हरेज) 17 टक्के (सीएजीआर) इतका घसघशीत परतावा दिला आहे, जो इतर पर्यायांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. 
 
5) अशा योजनेत तीन वर्षांचा “लॉक इन पीरियड’ असल्यामुळे फंड व्यवस्थापकाला गुंतवणुकीसाठी पुरेसा वेळ मिळतो आणि परतावा चांगला येऊ शकतो.
 
तात्पर्य : प्राप्तिकर बचतीचा इतका चांगला मार्ग असूनसुद्धा, केवळ योजनेमध्ये परताव्याची ‘हमी’ (गॅरंटी) नाही म्हणून गुंतवणूकदार त्याकडे दुर्लक्ष करतात. प्राप्तिकर बचत करावयाची नसेल तरीसुद्धा निव्वळ गुंतवणुकीसाठीसुद्धा अशा योजनांचा विचार करावयास हरकत नाही.

अभिप्राय द्या!