देशाची अर्थव्यवस्था सध्या संथगतीने वाटचाल करीत असली तरी, अर्थतज्ज्ञांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका अभ्यासानुसार गुंतवणूक चक्रातील सध्याचा तेजीचा कालखंड २०२२-२३पर्यंत असाच कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान महागाई वाढली तर, ती नियंत्रणातआणण्यासाठी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुकीवरील दबाव वाढण्याची शक्यता असल्याचेही रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.चालू आर्थिक वर्षातील जूनअखेरच्या तिमाहीत जीडीपीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये वाढ आणि शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने त्याचा परिणाम जीडीपी वाढण्यात झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर जगभर पसरलेली अनिश्चितता आणि त्याचा बाजारांवर पडलेला नकारात्मक प्रभाव यांमुळे अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यतीही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. साधारणत: २०१६-१७ पासून सुरू झालेला वाढत्या गुंतवणुकीचा ट्रेंड २०२२-२३ पर्यंत कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीतील वरिष्ठ सदस्य जनक राज, सत्यानंद साहू आणि शिवशंकर यांनी रिसर्च पेपरमध्ये नमूद केले आहे. याशिवाय आगामी काळात गुंतवणुकीचा दर सध्याच्या ३१.४ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या!