शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळत असला तरी तेथील चढउतार व अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार अन्य पर्यायांचीही चाचपणी करीत असतात. कोणत्याही एकाच प्रकारात गुंतवणूक करू नये, गुंतवणुकीत संतुलन साधणे आवश्यक आहे, असा सल्ला अर्थतज्ज्ञ नेहमी देतात. गुंतवणुकीच्या अन्य प्रमुख पर्यायांची ही ओळख.
एससीएसएस
एससीएसएस म्हणजेच सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे. तीन ते पाच वर्षांच्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ८.७ टक्क्यांनी व्याज मिळते. यातून ज्येष्ठ नागरिकांना तिमाही व्याज मिळण्याचीही सुविधा आहे. बँकेतील मुदत ठेवींपेक्षा ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे.
सुकन्या समृद्धी योजना
पीपीएफवर सध्या ८ टक्के व्याज लागू असून सुकन्या योजनेत ८.५ टक्के व्याज मिळत आहे. त्यामुळे मुलीचे शिक्षण व लग्नखर्च याच्या तरतुदीसाठी पीपीएफच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरते. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी हे खाते उघडता येते. यातही वार्षिक दीड लाखांच्या भरण्याची मर्यादा आहे. दोन मुलींसाठीही हे खाते सुरू करता येते. मात्र त्या दोन्ही खात्यांत मिळून वर्षभरात जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात.
ईएलएसएस
३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गुंतवणूकदारांना ८०सी कलमांतर्गत करवजावट हवी असेल तर त्यांनी पीपीएफऐवजी ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम) किंवा करबचत करणाऱ्या म्युच्युअल फंडात रक्कम गुंतवावी. त्यातून त्यांना अधिक परतावा मिळेल व करवजावटीचे उद्दिष्टही साध्य होईल. ४५ वा त्यापुढील वयाच्या गुंतवणूकदारांनी मात्र पीपीएफचा पर्याय निवडावा.