मोतीलाल ओस्वाल या गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज कंपनीने संपत्ती निर्मितीच्या संदर्भात केलेल्या एका अहवालानुसार गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करताना एचडीएफसी बॅंकेने रिलायन्स आणि टीसीएस या दोन मातब्बर कंपन्यांनाही मागे टाकले आहे. 2013 ते 2018 या पाच वर्षात एचडीएफसी बॅंकेने गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देत मालामाल केले आहे. याआधीच्या अहवालांमध्ये एचडीएफसी बॅंकेला दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले होते.
एचडीएफसी बॅंकेने गेल्या पाच वर्षात तब्बल 3,247 अब्ज रुपयांची संपत्ती गुंतवणूकदारांसाठी निर्माण केली आहे. तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 3,094 अब्ज रुपयांची संपत्ती याच काळात निर्माण केली आहे. त्याखालोखाल आयटी क्षेत्रातील दिग्गज टीसीएसचा नंबर लागतो. टीसीएस पाच वर्षात गुंतवणूकदारांना 2,532 अब्ज रुपये कमावून दिले आहेत. चौथ्या क्रमांकावर वाहन क्षेत्रातील मारुती सुझुकी आहे. मारुतीने गुंतवणूकदारांसाठी 2,308 अब्ज रुपये निर्माण केले आहेत. तर एफएमसीजी क्षेत्रातील मातब्बर कंपनी हिंदूस्थान युनिलिव्हरने गुंतवणूकदारांना 1,883 अब्ज रुपयांचा परतावा मिळवून देत पाचवे स्थान पटकावले आहे. टॉप टेन कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करावयाचे असल्यास जर या कंपन्यांमध्ये 2013 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर 2018 मध्ये त्याचे मूल्य तब्बल 17 लाख रुपये इतके झाले असते.