आज आजूबाजूला बरेच पालक असे दिसतात, की ज्यांची मुलं देशाबाहेर स्थायिक आहेत. अशा पालकांना जर ठराविक रक्कम नियमितपणे मिळावी असं त्यांच्या मुलांना वाटत असेल तर त्याची सोय एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘एसडब्ल्यूपी-बंधन’द्वारे केली आहे.

.‘एसडब्ल्यूपी’ अर्थात ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ ही एक अशी सोय आहे, की ज्याद्वारे तुमच्याच म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून तुमच्या सूचनेप्रमाणे दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या बॅंक खात्यात आपोआप जमा होते, ज्याचा तुम्हाला पेन्शनसारखा उपयोग होतो. ‘बंधन’मध्ये फरक इतकाच आहे, की ही रक्कम तुम्ही तुमच्या पालकांच्या किंवा मुलांच्या किंवा भाऊ-बहिणीच्या अथवा वैवाहीक जोडीदाराच्या बॅंक खात्यातसुद्धा जमा करू शकता. ही रक्कम लाभार्थींसाठी करमुक्त असते, कारण गुंतवणूकदाराने या रकमेवर त्याच्या कर पातळीनुसार कर भरावयाचा असतो.

काय अटी असतात?

लाभार्थी व्यक्ती ही तुमच्या कुटुंबाचा सदस्य असणे; तसेच त्याचे वय १५ वर्षे पूर्ण असणे आणि ते भारतीय नागरीक असणे बंधनकारक असते.लाभार्थीचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, गुंतवणूकदाराशी असलेले नाते; तसेच बॅंक खात्याचा पुरावा ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, लाभार्थीची म्युच्युअल फंड ‘केवायसी’ प्रक्रिया झालेली असेल तर कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत.  एसबीआय म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेमध्ये असलेल्या गुंतवणुकीतून ‘एसडब्ल्यूपी-बंधन’ करता येते. योजना सतत खुली असणारी (ओपन एंडेड) पाहिजे आणि त्यात वृद्धी (ग्रोथ) पर्याय निवडणे अनिवार्य आहे. किमान १२ महिन्यांसाठी व मासिक किमान ५००० रुपयांचा ‘एसडब्ल्यूपी’ करणे आवश्‍यक असते. ‘एसडब्ल्यूपी-बंधन’ तुम्ही केंव्हाही रद्द करू शकता. पुढील हप्त्याच्या सात दिवस आधी अशी सूचना देणे आवश्‍यक.तात्पर्य – तुमच्या कुटुंबातील सदस्याला नियमितपणे पैसे मिळतात, ते करमुक्त असतात आणि गुंतवणूकदारांनासुद्धा दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्‍यता असते. हे फायदे पाहता ‘बंधन’ सुविधेचा लाभ घेणे योग्य वाटते.

(डिस्क्‍लेमर – म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनेचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे. तसेच तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते.)

अभिप्राय द्या!