तुमच्याकडे स्वतःची मोटार असेल, तर तिचा विमा उतरवणे किती आवश्यक आहे याची तुम्हाला निश्चितच जाणीव असते. त्यातच पूर्वी कधी तुमच्या मोटारीचे नुकसान झाले असेल तर, मोटारविम्यात कोणत्या गोष्टींच्या भरपाईचा समावेश आहे आणि कोणत्या नाही याचीही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या देशात मोटार विमा उतरवणे कायद्याने बंधनकारक असल्यानेच विमा उतरवण्याचे प्रमाण अधिक आहे.
मोटारविमा योजना घेण्यापूर्वी या योजनेतील बारकावे, वैशिष्ट्ये, अटी आणि नियम यांचे बारकाईने वाचन करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. मोटारविमा योजनेचे नूतनीकरण करतानाही बहुसंख्य ग्राहक नवे बदल, अतिरिक्त सुविधा आणि योजनेत समाविष्ट नसलेल्या बाबींची माहिती न घेताच नूतनीकरण करतात. त्यानंतर मात्र गाडीचा अपघात झाल्यास त्याचा फटका त्यांना बसतो. निश्चितच मोटारविमा उतरवण्याचा किंवा त्याचे नूतनीकरण करण्याचा हा योग्य मार्ग नाही. काही विशिष्ट निकषांवर योग्य विचार करून विमा निवडला तर, हप्ताही कमी बसतो आणि अपघात झाल्यास भरपाईचा दावा करणेही सोपे जाते. त्यासाठी खालील बाबी समजून घेण्याची आवश्यकता आहे.
अतिरिक्त संरक्षण : मोटारविम्याचे नूतनीकरण करताना प्रत्येक वेळी तुमच्या विमा कंपनीकडून तुमच्यासाठी फायदेशीर असलेल्या अतिरिक्त विमा संरक्षणाविषयी (अॅड ऑन कव्हर) माहिती विचारून घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही सातत्याने पूर येणाऱ्या परिसरात राहात असाल, तर तुमच्या विम्यात इंजिन प्रोटेक्टरचा समावेश असलाच पाहिजे. शून्य घसारा (डेप्रिसिएशन) किंवा घसारा संरक्षक कवच घेणेही फायद्याचे ठरते. हे कवच घेतल्यानंतर विमा कंपनी गाडीच्या एखाद्या भागाची भरपाई घसारा मूल्यानुसार न देता बाजारभावाप्रमाणे देते.
ऐच्छिक कपात : तुम्ही आतापर्यंत विमा योजनेत ऐच्छिक कपात हा पर्याय निवडला नसेल तर, विम्याचे नूतनीकरण करताना तुम्ही ते करू शकता. त्यामुळे दावा करताना काही रक्कम तुम्हाला तुमच्या खिशातून भरावी लागते. ग्राहकाने किती रक्कम भरायची याची मर्यादा निश्चित केली जाते. हा पर्याय स्वीकारल्यास विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी होते.
वगळलेल्या बाबी : ग्राहक म्हणून तुम्ही घेतलेल्या मोटार विम्यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत व कोणत्या बाबी वगळल्या आहेत, याची माहिती घेणे हा तुमचा हक्कच नव्हे, तर तुमचे कर्तव्यही आहे. त्यानुसार तुमच्या विम्याचा आढावा घेण्याची वेळ विम्याचा दावा करतानाची नव्हे तर, नूतनीकरणाच्या वेळी असते. त्यामुळे नूतनीकरणापूर्वीच या बाबींची स्पष्ट विचारणा करणे आवश्यक आहे. तुम्हाला एखादे अतिरिक्त कवच हवे असल्यास तुम्ही अतिरिक्त शुल्क देऊन घेऊ शकता. विमा कंपनीच्या योजनेत काही बाबी वगळलेल्या असण्याची शक्यता असते, त्याची खात्री करून आपल्यासाठी काय फायद्याचे आहे, हे पाहणे हिताचे ठरते.
तांत्रिक सुधारणा : तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांमुळे विमा कंपन्यांनी मोटारविम्याची विक्री आणि दावे स्मार्टफोनवरच करता यावेत यासाठी अॅप्लिकेशन्स उपलब्ध करून दिली आहेत. ही अॅप्लिकेशन अतिशय वेगवान असून, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून विशिष्ट मर्यादेपर्यंतचे दावे अगदी वीस मिनिटांतही निकाली काढता येतात. नूतनीकरणापूर्वी तुमची विमा कंपनी ही सुविधा देते का, हे पडताळून पाहा. या सुविधेमुळे दावा करताना तुमचा मौल्यवान वेळ वाचतो, हे लक्षात घ्या.