आपण सध्या आर्थिक वर्षांच्या  आठव्या महिन्यांत असल्याने आयकर नियोजनाच्या दृष्टीने कमी कालावधी राहिला असल्याने फंड गटाच्या सरासरीहून अधिक परतावा दिलेल्या एका कर बचत अर्थात ‘ईएलएसएस फंडा’ची ही ओळख.

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान हा ईएलएसएस फंड गटातील २० वर्षे जुना फंड आहे. ईएलएसएस फंड गटात सर्वाधिक रोख रक्कम बाळगणारा फंड असल्याने मागील एका वर्षांत बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम झालेला हा फंड आहे.

या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे ९ मार्च २०१५ पासून सचिन रेळेकर यांच्याकडे आहेत. फंडाची गुंतवणूक मल्टी कॅप फंडाप्रमाणे असून फंडाच्या मालमत्तेत ४७.२९ टक्के लार्ज कॅप, ३०.५६ टक्के मिड कॅप, २.८७ टक्के स्मॉल कॅप प्रकारचे समभाग आहेत. फंडाच्या गुंतवणुकीचा २० टक्के हिस्सा आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणुकीत आहे. त्या खालोखाल अनुक्रमे खाजगी बँका, वित्तीय कंपन्या, रसायने, वाहन आणि वाहन निर्मिती या उद्योगातून गुंतवणूक केली गेली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, विनाती ऑरगॅनिक्स, सिटी युनियन बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट, कोटक महिंद्रा बँक, आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. निर्देशांक जसे नवीन उच्चांक गाठू लागले तसेतसे निधी व्यवस्थापक नफावसुली करून आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणुकीतील हिस्सा वाढवत गेले. बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम या फंडावर झाला आहे. अनेकदा फंडाच्या प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा निधी व्यवस्थापक फंड घराणे इत्यादी बाबींवर फंडाची गुंतवणुकीसाठी निवड केली जाते.

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान या फंडाची कामगिरी अन्य ईलएसएस फंडाच्या कामगिरीच्या जवळपास जाणारी असल्याने आयकराच्या कलम ८० सी खाली उपलब्ध असलेल्या वजावटीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या करदात्यांनी एलआयसी एमएफ टॅक्स प्लानचा गंभीरपणे गुंतवणुकीसाठी विचार करावा ही धनलाभ च्या वाचकांना सूचना !!

अभिप्राय द्या!

Close Menu