दीर्घ कालावधीचा विचार केला तर इक्विटीमधून फार चांगला परतावा मिळतो, असे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. इक्विटी परतावा हा सर्वसाधारणपणे जीडीपीच्या दराचे अनुसरण करतो. त्यामुळे अल्प काळातील घसरणीमुळे विचलित न होता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक किमान पाच ते सात वर्ष कायम राखावी.

परताव्यात घटआल्यास फंडाच्या योजनेमध्ये बदल करावा काय?

एखाद्या योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी फंड मॅनेजरला किमान तीन ते पाच वर्षांचा अवधी देण्याची गरज असते. केवळ वर्षभराच्या कालावधीत कोणत्याही योजनेला जोखता येत नाही. तीन वर्षांनंतरही एखादी योजना चांगला परतावा देत नसेल तर मात्र त्यातून बाहेर पडणे योग्य ठरते. यासाठी फंड मॅनेजरचा सल्ला घ्यावा.

एसआयपीतील गुंतवणूक किती काळ चालू ठेवावी?

आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एसआयपीचा चांगला उपयोग होऊ शकतो. ही उद्दिष्टे दीर्घकालीन मुदतीनंतरच पूर्ण होणे शक्य असल्याने एसआयपीमधील गुंतवणूक ही आधी म्हटल्याप्रमाणे पाच ते सात वर्ष असावी. काही गुंतवणूकदार तीन वर्षांचा कालावधीही निवडतात, तर काही गुंतवणूकदार १० वर्षांपेक्षा अधिक काळ एसआयपी चालू ठेवतात. आर्थिक उद्दिष्ट नसल्यास एसआयपीतील गुंतवणूक ही किमान सहा महिने तरी असावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

परतावा मिळत नसलेल्या योजनेत अधिक पैसे गुंतवावेत काय?

होय. शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळलेला असताना इक्विटीमधील गुंतवणूक वाढविण्याची सुसंधी असते. ही संधी साधायला हवी. नोकरदारांचा पगार वाढल्यास अथवा वार्षिक पगारवाढ मिळाल्यास त्या प्रमाणात एसआयपीमध्ये वाढ करणे योग्य ठरते. एसआयपीमधील गुंतवणूक ही नेहमी पगाराच्या प्रमाणात असावी.

अभिप्राय द्या!