सध्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ‘एसआयपी’ची माहिती झाली आहे; परंतु ‘एसटीपी’चे काय? एसआयपीच्या अगदी विरुद्ध पद्धतशीर हस्तांतरण योजना (एसटीपी) हा असा शब्दप्रयोग आहे ज्याची अनेक गुंतवणूकदारांना पुरती माहिती नसण्याचाच संभव आहे. एसआयपी म्हणजे बचत खात्यातून म्युच्युअल फंडात पैसे हस्तांतरित करणे, तर एसटीपी म्हणजे एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे हस्तांतरित करणे.
कसा फायदा होतो?
जोखमीचे व्यवस्थापन: एसटीपीमुळे अधिक जोखीम असलेल्या श्रेणीतून दुसऱ्या कमी जोखीम असलेल्या मत्तेच्या श्रेणीत पैसे वळवता येतात. उदाहरणार्थ, समजा, तुम्ही निवृत्तीच्या नियोजनासाठी ३० वर्षांसाठी इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी सुरू केलीत. तुम्ही जसे निवृत्तीच्या जवळ पोहोचाल तसे तुम्ही फंड मूल्याचे संभाव्य नुकसान होणे टाळण्यासाठी एसटीपी सुरू करू शकता. या ठिकाणी तुम्ही फंड घराण्याला इक्विटी योजनेतून डेट योजनेत ठरावीक रक्कम हस्तांतरित करण्याची सूचना देऊ शकता. अशा प्रकारे, तुम्ही जेव्हा निवृत्त व्हाल तेव्हा तुमचे सर्व पैसे त्यामानाने सुरक्षित गुंतवणुकीत वळविलेले असतील.
लाभ कोणी घ्यावा?
ज्यांना ठोस रकमेत गुंतवणूक करायची असेल, परंतु एकाच ठिकाणी गुंतवणूक करायची नसेल त्यांनी एसटीपीला अधिक प्राधान्य द्यावे. एकंदरीतच इक्विटीजच्या बाबतीत ज्यांची भूमिका सावध असते, असे गुंतवणूकदार त्यांचे पैसे लिक्विड किंवा डेट योजनांमध्ये टाकण्याची निवड करू शकतात. जेव्हा हे पैसे इक्विटी योजनांमध्ये हस्तांतरित होतात तेव्हा तुम्हाला डेट योजनांद्वारे स्थिर मिळकत मिळते आणि त्याचबरोबर इक्विटी योजनांद्वारे संभाव्य परतावा मिळू शकतो.
एसटीपीचे प्रकार
स्थिर एसटीपी- स्थिर रक्कम हस्तांतरित केली जाते.
भांडवलवृद्धी- वाढलेले भांडवल हस्तांतरित केले जाते.फ्लेक्सी एसटीपी- मूळ योजनेतून नियोजित योजनेत वेगवेगळी रक्कम हस्तांतरित करू शकता.
एसटीपीद्वारे गुंतवणूक करताना लक्षात ठेवा
- तुमच्यापाशी गुंतवणूक करण्यासाठी ठोस रक्कम असल्यास आणि तुम्हाला नजीकच्या भविष्यात ती काढून घेण्याची गरज नसल्यासच फक्त एसटीपीचा लाभ घ्यावा.
- एसटीपी ही अतिशय विश्वसनीय, जोखीम कमी करणारी धोरणात्मक योजना आहे जिचा गुंतवणूकदार लाभ घेऊ शकतो; परंतु ते जोखीम संपूर्णपणे नाकारू शकत नाहीत.
- या पद्धतीत शिस्तीची गरज असते. समजा, बाजारपेठेत अचानक होणाऱ्या चढउतारामुळे किंवा दरांमध्ये बदल होण्यामुळे तुम्ही घाबरून योजनेतून बाहेर पडण्याचे ठरविल्यास त्याचा मूळ हेतूच नष्ट होईल.
- मूळ मत्ता आणि त्याचे टप्पे यावर नेहमी लक्ष ठेवा. उदाहरणार्थ, जेव्हा बाजारपेठ खूप वर जाते तेव्हा भांडवल हस्तांतरित करण्याचा उतावीळपणा केला जाऊ शकतो.
थोडक्यात, जोखमीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी एसटीपी ही फायदेशीर योजना आहे.