पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि बाजाराचे योग्य मूल्य या बाबी वगळता ज्या कारणांनी बाजारात घसरण झाली आहे, ते घटक आता बाजारासाठी पूरक बनत आहेत. कच्च्या तेलाचा भाव प्रतिपिंप ८६ वरून ५९ डॉलरपर्यंत घसरला असून, रुपयाचा विनिमय दर ७०.६७ पर्यंत वधारला आहे. कच्च्या तेलाच्या भावात ३१.३९ टक्के घट झाली असून, रुपयाचा भाव ४.४८ टक्के वधारला आहे. या दोन्ही घटकांमुळे आयात खर्चात एकूण ३५.८७ टक्के लाभ झाला आहे. या बाजूने बाजाराला वाटणारी टोकाची भीती आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 
 
सप्टेंबरअखेरच्या तिमाहीचे विविध कंपन्यांचे आर्थिक निकाल लागले असून, बाजारातील २०३ कंपन्यांपैकी १९९ कंपन्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी ९४ कंपन्यांनी महसूल व निव्वळ नफा तिमाही व वार्षिक अंतराने वाढीत जाहीर केला आहे. हे प्रमाण फार उत्साहवर्धक नसले तरी फार खराबही नाही.
बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) बॅंकांनी वाढीव चलन देण्याची अपेक्षा व सरकारी बॅंकांवर टाकलेले काही निर्बंध मागे घेण्याची सरकारची सूचना, यांवर रिझर्व्ह बॅंकेने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. परिणामी, ‘एनबीएफसीं’ना रोकड कमी पडल्यास हमीपत्रावरील परतावा वेळेत देण्यास काही कंपन्या कमी पडण्याची भीती बाजाराला वाटत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालातून २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल कसा असेल, याचा अंदाज घेत शेअर बाजार थोडे दिवस खाली-वर होत एकाच पातळीत राहण्याची शक्‍यता आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu