प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांनी म्युच्युअल फंडातील एसआयपी किंवा सिस्टॅमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे महत्त्व स्पष्ट केले आहे. एसआयपी प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाचा भाग असला पाहिजे असे मत राकेश झुनझूनवाला यांनी मांडले आहे. येणाऱ्या काळात भारताचे इक्विटी मार्केट सर्वसामान्यांसाठी मोठी संपत्ती निर्माण करून शकेल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर म्युच्युअल फंड (एसआयपी) गुंतवणूकदारांनी जास्त मोह बाळगता कामा नये. या गुंतवणूकीतून त्यांनी 12 ते 13 टक्क्यांपेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा ठेऊ नये. 
 
येत्या काळात एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणूकीत वाढच होणार आहे. त्यात घट होण्याची चिन्हे नाहीत. एसआयपीत गुंतवणूक करणारे मुळात इक्विटी प्रकारातील गुंतवणूकीची अपेक्षा त्यातून करत नाहीत. ते पीपीएफ आणि विम्यासारख्या प्रकारांशी एसआयपीच्या परताव्याची तुलना करतात. त्यामुळे त्यांनी 15 टक्के परतावा मिळाला तरी ते खूष असतील, असे मत झुनझुनवाला यांनी मांडले. भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक करणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. तुम्ही सावधच असले पाहिजे. चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्येच गुंतवणूक केली पाहिजे.
 
मिडकॅप प्रकारातील शेअरबद्दलचा गुंतवणूकदारांचा उत्साह आता कमी झाला आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरसुद्धा झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता आणि अनिश्चिततेची भावना वाढली आहे. भारतीय बॅंकींग क्षेत्र येणाऱ्या काळात चांगली कामगिरी करेल त्याचबरोबर चांगल्या व्यवस्थापन असलेल्या बॅंका उत्तम परतावा देतील. आयएल अॅंड एफएससारख्या प्रकरणातून बॅंका बाहेर येतील. 

अभिप्राय द्या!