सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात “एसआयपी’ ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. “एसआयपी’सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे “एसआयपी’चा घेतलेला वसा कधीही टाकू नये; उलट “स्टेप अप’ या पर्यायाचा जरूर उपयोग करून गुंतवणुकीची गती वाढविणे योग्य.
“एसआयपी’ किती? 
मासिक उत्पन्न – मासिक खर्च = मासिक गुंतवणूक, अशा हिशेब न करता उत्पन्न – गुंतवणूक = खर्च, असे ठरविले तरच शिस्तीने दर महिन्याचे “एसआयपी’ नक्की होईल म्हणजे आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करायची रक्कम आधी निश्‍चित करून मगच खर्च करावा. थोडेसे आक्रमक धोरण स्वीकारून, सहजशक्‍य असेल त्या रकमेपेक्षा अधिक रकमेची “एसआयपी’ करण्याचे ध्येय ठेवावे, म्हणजे 5,000 रुपयांचे “एसआयपी’ सहज जमत असेल तर 6,000 चे करावे. 
 
स्टेप अप एसआयपी 
अनेकदा असे दिसते, की दीर्घ मुदतीचे (म्हणजे 10 वर्षांपेक्षा अधिक) कमी रकमेचे “एसआयपी’ केले जातात. असे केल्याचा एक फायदा आहेच, की तोपर्यंत तुमचे “एसआयपी’ चालूच राहते, पण त्याची दुसरी बाजू ही, की नंतर (पगारवाढ/बढतीमुळे) उत्पन्न वाढले तरीही या रकमेत वाढ होत नाही. तसेच ज्या योजनेत “एसआयपी’ चालू केले असते, त्या योजनेची कामगिरी जर खालावली असेल तर त्यात बदलही होत नाही. त्यासाठी आपल्या गुंतवणुकीचा नियमितपणे (वर्षातून किमान एकदा) आढावा घेणे जरुरीचे आहे. तसेच “स्टेप अप एसआयपी’चा पर्याय निवडल्यास दरमहा किंवा 12 महिन्यांनी त्यात ठराविक रकमेची भर पडत जाईल. उदा. जर 10,000 रुपयांनी एसआयपी सुरू केला, तर 12 महिन्यांनी त्यात 1000 रुपयांच्या वाढीचा पर्याय निवडला, तर पुढच्या वर्षामध्ये “एसआयपी’ची रक्कम 11,000, 12,000 अशी वाढत जाऊन 10 व्या वर्षी ही रक्कम 19,000 होईल. तुमची आर्थिक उद्दिष्टे लवकर पूर्ण व्हायला याचा चांगला उपयोग होईल. 
 
एसआयपी + आयुर्विमा 
काही म्युच्युअल फंड कंपन्या (उदा. आदित्य बिर्ला सनलाइफ, आयसीआयसीआय प्रूडेन्शियल, रिलायन्स) काही अटींवर (वय, कमाल रक्कम आदी) “एसआयपी’च्या हप्त्याच्या 100 पट आयुर्विमा रकमेचे संरक्षण देतात. या ग्रुप इन्श्‍युरन्स पॉलिसीचा फायदा विनामूल्य असल्याने या प्रकारच्या “एसआयपी’चाही जरूर विचार करावा. 
 
“एसआयपी’ कशात करावे? 
आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि ऍसेट ऍलोकेशननुसार “एसआयपी’ची रक्कम, कालावधी आणि योजनेचा प्रकार निश्‍चित करता येतो. दीर्घकाळाचे उद्दिष्ट असेल तर कमी जोखमीच्या बॅलन्स्ड ऍडव्हांटेजसारख्या योजनेत “एसआयपी’ करण्यापेक्षा मल्टी कॅप/ मिड/ स्मॉल कॅप योजनांचा विचार करावा. चांगल्या योजनेची निवड जर केली नाही, तर कमी परतावा मिळून नुकसान होते.
थोडक्‍यात, “एसआयपी’सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. अर्थातच “एसआयपी’चा घेतलेला वसा टाकू नये आणि “स्टेप अप’ या पर्यायाचा जरूर उपयोग करून गुंतवणुकीची गती वाढवावी. 

अभिप्राय द्या!