गेल्या काही काळात बॅंकांचे व्याजदर कमी व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्याना आता आपले पुढे कसे भागणार आणि आता कशात गुंतवणूक करावी, असा रास्त प्रश्‍न पडला आहे. जसजशी देशाची आर्थिक प्रगती होत जाते, तसेतसे व्याजदर कमी होतात, असे प्रगत देशांकडे पाहिले की लक्षात येते. देशातील महागाईवाढीच्या दराशी व्याजदर निगडित असतात. आपल्या देशात सध्या 10 वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवर एक वर्षापूर्वी असलेले 8 टक्के व्याज आता 7.7 टक्के एवढे कमी झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी रेपो दरात कपात करुन कमी व्याजदरांचे धोरणच राबविले जाईल, असे दिसते आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठेवींवरच्या व्याजापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात आणि नियमित उत्पन्नासाठी इक्विटी जास्त असलेल्या बॅलन्स्ड फंड योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे. निवृत्तीच्या काळात खरे उत्पन्न (मिळणारे व्याज-महागाई दर) वाढविण्यासाठी बॅलन्स्ड योजनेतून ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान’चा (एसडब्ल्यूपी) चांगला उपयोग होईल. मात्र, त्यासाठी भांडवलात तात्पुरती घट झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता हवी. याशिवाय बॅलन्स्ड योजनांचे इतरही फायदे आहेतच. ते पुढीलप्रमाणे-
1) एकाच योजनेतून डेट (कर्जरोखे) आणि इक्विटी (शेअर्स) योजनेचे फायदे (म्हणजे स्थिरता आणि वृद्धी) मिळू शकतात. जास्त योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागत नाही, 2) नियोजित ‘ऍसेट ऍलोकेशन’ कायम ठेवण्यासाठी दरमहा ‘रिबॅलन्सिंग’ करीत असल्याने गुंतवणूकदाराला त्याकडे लक्ष ठेवावे लागत नाही. डेट व इक्विटी भागाच्या विक्रीवर ‘एक्‍झिट लोड’ पण द्यावा लागत नाही, 3) नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी या योजना अतिशय उपयुक्त ठरतात, 4) ‘रिबॅलन्सिंग’साठी जेव्हा डेट किंवा इक्विटी भागाची विक्री होते, त्यावरील अल्प मुदतीचा भांडवली लाभ कर हा गुंतवणूकदाराला द्यावा लागत नाही.
 
बॅलन्स्ड फंडात खुल्या आणि बंद अशा दोन्ही प्रकारच्या योजना असतात आणि या दोन्ही प्रकारांमध्ये इक्विटी किंवा डेट प्रकार जास्त असणाऱ्या योजना असतात. डेट प्रकार जास्त (70 टक्‍क्‍यांपेक्षा) असणाऱ्या खुल्या योजनांना ‘एमआयपी’ असे म्हटले जाते. यात साधारणपणे 15 ते 30 टक्के इक्विटी आणि उर्वरित डेट असतात. यामुळे यातील जोखीम कमी असते; पण परतावाही इक्विटी आधारित बॅलन्स्ड योजनांपेक्षा कमी असतो. त्यामुळे अधिक परताव्यासाठी इक्विटीचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांची निवड करावी. एकरकमी किंवा ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’द्वारे (एसआयपी) ठराविक रक्कम बॅलन्स्ड फंड योजनेत जमा करून त्यातून निवृत्तीच्या काळात रक्कम काढून घेता येते, ज्याला सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) म्हणतात. मासिक लाभांश घेण्याचाही पर्याय असतो, पण ती रक्कम बाजारावर अवलंबून असल्याने त्यात अनिश्‍चितता आहे. त्यापेक्षा निश्‍चित रकमेचा एसडब्ल्यूपी जास्त उपयोगी ठरेल. दरमहा किती रक्कम काढावी, हे गुंतवणूकदाराने ठरवायचे असते.

अभिप्राय द्या!