म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एखाद्या योजनेने भूतकाळात किती परतावा दिला आहे, या एकाच निकषावर अवलंबून न राहता त्या फंडातील जोखीम आणि त्याने दिलेला परतावा, यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी “शार्प रेशो’चा अर्थ समजावून घेतल्यास फंडाची निवड करताना त्याचा उपयोग होऊ शकतो.
कमीतकमी जोखीम घेऊन अधिक काम करणाऱ्या व्यक्तीला आपण “शार्प’ अर्थात चाणाक्ष म्हणतो. व्यक्तीप्रमाणेच म्युच्युअल फंडसुद्धा किती “शार्प’ आहे, हे ठरविता येते. त्यासाठी “शार्प रेशो’ची मदत घेतली जाते. फंडाने घेतलेली जोखीम आणि दिलेला परतावा याचे गुणोत्तर हा रेशो मांडतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदाराने एखाद्या योजनेने भूतकाळात किती परतावा दिला आहे, या एकाच निकषावर अवलंबून न राहता त्या फंडातील जोखीम आणि त्याने दिलेला परतावा यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी “शार्प रेशो’चा अर्थ समजावून घेतल्यास फंडाची निवड करताना त्याचा उपयोग होऊ शकतो.
“शार्प रेशो’ हा म्युच्युअल फंडाने घेतलेली जोखीम आणि दिलेला परतावा, याचे गुणोत्तर मांडतो, ज्यामुळे या दोन्ही घटकांमधील समतोल साधता येतो. गुंतवणूक क्षेत्रात “हाय रिस्क – हाय रिटर्न्स’ हे सूत्र आपण नेहमी ऐकतो. गुंतवणूकदाराने अधिक परताव्याची अपेक्षा धरताना अधिक जोखीम घेण्याची तयारी ठेवणे अपेक्षित असते, असा त्याचा अर्थ आहे. परंतु, अधिक परतावा मिळविण्यासाठी किती अधिक जोखीम घ्यायची, हेसुद्धा सुज्ञ गुंतवणूकदाराने ठरविले पाहिजे. फंडातील जोखीम दुर्लक्षित करीत केवळ परताव्याकडे पाहून गुंतवणूक केल्यास सर्वच गुंतवणूक अधिक जोखीमयुक्त फंडात होऊ शकते. म्हणूनच जो फंड परतावा आणि जोखीम या दोन्हींचा समतोल साधतो, तो अधिक “शार्प फंड’ म्हणता येईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जोखीमविरहित गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा एखादा फंड किती अधिक परतावा देत आहे, हे सांगणारा रेशो म्हणजे “शार्प रेशो’ होय. या ठिकाणी जोखीमविरहित गुंतवणूक म्हणजे अशी गुंतवणूक, ज्यामध्ये मुद्दल आणि परतावा बुडण्याची शक्यता खूपच कमी असते. उदाहरणार्थ, सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक. अशा जोखीमविरहित गुंतवणुकीपेक्षा किती अधिक परतावा म्युच्युअल फंड देत आहे, हे “शार्प रेशो’ सांगतो.
मर्यादा लक्षात ठेवा!
“शार्प रेशो’च्या आधाराने कोणत्याही निष्कर्षाला पोचताना काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. मुळात “शार्प रेशो’ हा केवळ एक आकडा असल्याने, जोपर्यंत त्याची तुलना दुसऱ्या आकड्याबरोबर होत नाही, तोपर्यंत त्यातून फारसा अर्थबोध होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाचा शार्प रेशो 1.20 आहे, असे सांगितले, तर त्यातून गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी फारशी मदत होत नाही. परंतु, ज्यावेळी एका फंडाच्या “शार्प रेशो’ची तुलना दुसऱ्या फंडाच्या “शार्प रेशो’सोबत किंवा निर्देशांकाच्या “शार्प रेशो’सोबत केली जाते, तेव्हा गुंतवणुकीविषयीचा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळते. त्याचप्रमाणे अतिशय कमी “स्टॅंडर्ड रेशो’ असलेल्या फंडाचा “शार्प रेशो’ तुलनेने अधिक असतो. त्यामुळे असा फंड सर्वोत्तम परतावा देतो, असे म्हणणे चुकीचे ठरते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, “शार्प रेशो’ हा केवळ संख्यात्मक तुलना दाखवतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या बॅंकिंग फंडाच्या परताव्याचे आणि जोखमीचे गुणोत्तर काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि त्याची तुलना दुसऱ्या बॅंकिंग फंडासोबत करण्यासाठी “शार्प रेशो’ मदत करतो. परंतु, मुळात बॅंकिंग सेक्टरचे भवितव्य कसे आहे, यावर “शार्प रेशो’ भाष्य करीत नाही. म्हणूनच फंडाची निवड करताना “शार्प रेशो’सोबतच त्या फंडाची मूलभूत माहिती करून घेणे योग्य ठरते.