मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंड हा ईएलएसएस फंड गटातील उत्तम परतावा असलेला फंड आहे.

तीन वर्षांपूर्वी फंडाच्या पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.५ लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे १९ डिसेंबर २०१८ च्या एनएव्हीनुसार २.५२ लाख रुपये झाले आहेत. येत्या शुक्रवारी २८ डिसेंबर रोजी तीन वर्षे पुरी करत आहे. फंडाने सुरुवातीपासून १६.९२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. नीलेश सुराणा हे फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या ३० नोव्हेंबरच्या ‘फॅक्टशीट’नुसार फंडाची मालमत्ता १,२०९ कोटी आहे. बँकेचे किंवा औद्योगिक घराण्याचे प्रवर्तन नसूनही फंडाला तीन वर्षे पुरी होण्याआधी फंडाने १ हजार कोटींच्या मालमत्तेचा टप्पा पार करणे हे विशेषच.

आयकराच्या कलम ८० (सी) खाली उपलब्ध पर्यायांपैकी ईएलएसएस फंड या गुंतवणूक साधनाने सर्वाधिक परतावा दिला आहे. मागील दहा वर्षांत ईएलएसएस फंडांनी करबचतीव्यतिरिक्त वार्षिक १८.३४ टक्के वृद्धी दर राखला आहे. ५ वर्षे मुदतीच्या कर-कपातप्राप्त मुदत ठेवींनी वार्षिक परतावा ५.३२ टक्के, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणुकीतून वार्षिक परतावा ८.७८ टक्के, तर पारंपरिक विमा पॉलिसीतील गुंतवणुकीतून विमाछत्राव्यतिरिक्त वार्षिक परतावा ५.३२ टक्के मिळाला आहे. कर बचतीव्यतिरिक्त संपत्तीची निर्मिती करण्यासाठी ईएलएसएस फंडाव्यतिरिक्त अन्य गुंतवणूक साधने बिनकामाची आहेत. शुद्ध विमा, ईएलएसएस फंड आणि अतिरिक्त ५० हजार रुपये ‘एनपीएस’मधील गुंतवणूक ही करबचतीची त्रिसूत्री आहे. कमावत्या वयात वर्षांला १२ हजार रुपये याप्रमाणे २५ वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने ईएलएसएस फंडात गुंतविल्यास आणि या गुंतवणुकीवर १२ टक्के चक्रवाढ परतावा मिळेल असे गृहीत धरल्यास ३६ लाखांच्या गुंतवणुकीचे २.२७ कोटी मिळविणे सहज शक्य आहे. बाजारातील चढ-उतारांना निर्धारपूर्वक सामोरे गेल्यास ईएलएसएस फंडाच्या गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्य आहे.

 

अभिप्राय द्या!

Close Menu