देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी असलेली एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी(एएमसी) मालमत्तेनुसार (एयुएम) नुसार देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. डिसेंबर मध्ये संपलेल्या तिमाहीत एचडीएफसी एएमसी 3.35 लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाकडे 3 लाख हजार कोटींची गुंतवणूक आहे. महत्वाचे म्हणजे, 2016 नंतर प्रथमच एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलला मागे टाकले आहे. 2011 मध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडाला मागे टाकत एचडीएफसीने सलग पाच वर्षे गुंतवणूकदारांची पसंती मिळविली होती. मात्र 2016 मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलने एचडीएफसी एएमसीला मागे टाकले होते.
गुंतवणुकीचा सोपा आणि उत्तम पर्याय म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची पसंती म्युच्युअल फंडाला मिळत असताना एचडीएफसी म्युच्युअल फंड देशातील जास्तीती जास्त गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूक योजनांकडे आकर्षित करण्यास यशस्वी झाला आहे. 2018 मध्ये एचडीएफसी एएमसीची मालमत्ता तब्बल 16 टक्क्यांनी वाढली आहे.
आयएल अँड एफएस प्रकरणानंतर बहुतेक कॉर्पोरेट गुंतवणूकदारांनी मजबूत ब्रँड्ससह सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचा फायदा एचडीएफसी म्युच्युअल फंडाला झाला आहे. या काळात एचडीएफसीच्या डेट प्रकारातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गुंतणूकदारांनी छोट्या म्युच्युअल फंड कंपन्यांमधील आपले पैसे मोठ्या प्रमाणात एचडीएएफसीमध्ये वळविले आहेत.