एलआयसी म्युच्युअल फंडाने नवीन ‘एलआयसी एमएफ आर्बिट्राज फंड’ या नावाने नवा फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड स्किम प्रकारातील फंड असून आर्बिट्राज प्रकारातील गुंतवणूक संधींचा लाभ यातून घेतला जाणार आहे. या फंडाची ऑफर 4 जानेवारीपासून गुंतवणूकीसाठी खूली झाली आहे. तर 18 जानेवारी ही यासाठीची अंतिम मुदत आहे. या फंडातील इक्विटी प्रकाराचे व्यवस्थापन योगेश पाटील करणार आहेत. यातील डेट प्रकाराचे व्यवस्थापन मर्झबान इराणी करणार आहेत.
या नव्या फंडात गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणूक करू शकतात. आर्बिट्राज प्रकारात कॅश आणि डेरिवेटिव्ह मार्केटच्या संदर्भात असलेली तसेच डेट सिक्युरिटीज आणि मनी मार्केटमधील संधी या फंडातील गुंतवणूकीतून मिळवण्याचे ‘एलआयसी एमएफ आर्बिट्राज फंडाचे उद्दिष्ट आहे. फंड मॅनेजर संख्यात्मक विश्लेषण पद्धतीचा वापर करून आर्बिट्राज प्रकारातील संधींचा लाभ घेणार आहे. या फंडातील 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित प्रकारात केली जाणार आहे. यात डेरिव्हेटिव्ह, इंडेक्स, शेअर इत्यादी पर्यायांचा समावेश असेल. डेट प्रकारात 35 टक्क्यांपर्यत गुंतवणूक केली जाणार आहे, त्यात मनी मार्केटसारख्या गुंतवणूक प्रकारांचा समावेश असणार आहे.
आर्बिट्राज फंडांमध्ये इक्विटी प्रकारात 65 टक्क्यांपर्यत गुंतवणूक केली जात असल्यामुळे कराच्या दृष्टीने ते इक्विटी फंडच समजले जातात. आर्बिट्राज प्रकारातील मध्यम स्वरूपाच्या जोखमीद्वारे चांगला परतावा मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड आहे.