राणा कपूर पायउतार झाल्यानंतर येस बॅंकेच्या सीईओपदाची जबाबदारी कोणाकडे येणार हा प्रश्न लवकरच सुटणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने राणा कपूर यांना मुदतवाढ नाकारल्यानंतर बॅंकेच्या संचालक मंडळाने नवीन सीईओचा शोध सुरू केला होता. अखेर दोन उमेदवारांना बॅंकेच्या संचालक मंडळाने अंतिम निवड प्रक्रियेत स्थान दिले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. येस बॅंकेचे कार्यकारी संचालक रजत मोंगा आणि मॅक्स लाईफ इन्श्युरन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सूद या दोघांच्या नावावर निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे. 
 
त्यामुळे आता येस बॅंकेला मुख्य कार्यकारी अधिकारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रजत मोंगा आणि राजेश सूद या दोघांपैकी एकजण आता येस बॅंकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे. राजेश सूद यांचा मॅक्स लाईफ इन्श्युरन्स कंपनी उभारण्यात मोठा वाटा आहे. त्यांनी यात 18 वर्षांचे घवघवीत योगदान दिले आहे. पाच वर्षांची दूसरी टर्म पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राजेश सूद यांनी मॅक्स लाईफच्या व्यवस्थापकीय पदाची सूत्रे खाली ठेवली होती. याआधी त्यांनी एएनझेड ग्रींडलेज बॅंक आणि बॅंक ऑफ अमेरिकेतही काम केले आहे.
तर रजत मोंगा येस बॅंकेच्या स्थापनेपासून 2004 पासून बॅंकेत कार्यरत आहेत. ते बॅंकेचे चीफ फायनान्शियल ऑफिसरसुद्धा आहेत.

अभिप्राय द्या!

Close Menu