आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली ‘इन्फोसिस’ पुन्हा एकदा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या 11 जानेवारीला होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरच्या ‘बायबॅक’ प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचे समजते. कंपनीकडून 1.6 अब्ज डॉलर मूल्यही शेअर पुन्हा विकत घेतले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 11 हजार 264 कोटी रुपयांचे शेअर विकत घेतले जाणार आहे. शिवाय गुंतवणूकदारांसाठी स्पेशल डिव्हिडंटची देखील घोषणा केली जाणार आहे.
 
कंपनी येत्या 11 जानेवारीला तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने 13 हजार कोटी रुपयांचे ‘शेअर बायबॅक’ केले होते. इन्फोसिसच्या जवळपास 36 वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय एप्रिल महिन्यात कंपनीने स्पेशल डिव्हिडंटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 2,600 कोटी रुपयांचे वाटप केले होते. त्यावेळी प्रतिशेअर 10 रुपये डिव्हिडंट देण्यात आला होता. 
 
आज मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर 672.30 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 2.45 रुपयांची वाढ झाली आहे. 

अभिप्राय द्या!