गृहकर्ज सुलभतेने मिळवण्यासाठीच्या या सूचना
तुमचे पत (क्रेडिट) नामांकन तपासा : कमी दराचे गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचे पतनामांकन तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जसे की ‘सीबीएल’ किंवा ‘एक्वीपॅक्स’. ग्राहकाने अशाप्रकारचे पतनामांकन केले नसेल तर त्याला ‘प्रीमियर’ भरावा लागतो. त्यामुळे चांगले पतनामांकन राखणे गरजेचे आहे.
घर घेण्यापूर्वीच गृहकर्जाची मंजुरी मिळवा : घर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्राहकाने आपले ‘बजेट’ तपासावे. तसेच आपल्याला किती गृहकर्ज मिळू शकेल तसेच किती ‘डाऊनपेमेंट’ करावे लागेल याचा अंदाज घ्यावा. बरेच जण आधी घराची खरेदी करण्याची चूक करतात नि मग गृहकर्ज मिळवण्याच्या मोहिमेस त्यांच्याकडून प्रारंभ होतो. उदा. एखाद्या मालमत्तेचे मूल्य जर ६० लाख रुपये असेल आणि ग्राहकाकडे बचत म्हणून २० लाख रुपये असतील तसेच त्याची २५ लाख रुपये गृहकर्ज मिळण्याचीच ऐपत असेल तर गृहखरेदीचा सौदा पूर्ण होऊ शकणार नाही.
‘डाऊनपेमेंट’ किती असावे? : घरखरेदी करताना ग्राहकाने सर्वसाधारणपणे १० ते २५ टक्के एवढ्या ‘डाऊनपेमेंट’ दराव्यतिरिक्त इतर खर्चाचाही विचार करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे स्टॅंप ड्युटी, क्लब शुल्क, विकास शुल्क, इन्शुरन्स खर्च, सोसायटी डिपॉझिट… आदी गोष्टींसाठी कर्ज मिळत नाही. त्यामुळे कोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळते आणि कशासाठी मिळत नाही याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
तरल (फ्लोटिंग) व्याजदर म्हणजे काय ? : सर्वसाधारणपणे गृहकर्जदार हा आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी २० ते ३० वर्षांचा कालावधी निवडतो. तरल दरांमध्ये वेगवेगळ्या बदलत्या व्याजदरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. त्यामध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक पर्यायाचाही समावेश आहे. – व्याजबदल पर्याय नेमका कधी कार्यान्वित होतो? : उदा. समजा एखाद्या ग्राहकाने सप्टेंबर २०१७ मध्येवार्षिक बदल व्याजदराने कर्ज घेतले असेल तर त्याचा व्याजवर हा एकदाच म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये बदलतो. मात्र एखाद्या ग्राहकाने समजा गृहवित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून कर्ज घेतलेले असेल- त्याचे व्याजदर सर्वसाधारणपणे तिमाहीला बदलतात- तर या गृहकर्जाचा दर वर्षातून किमान तीन वेळा तरी बदलतो. त्यामुळे सध्या व्याजदर वाढण्याचे चित्र असताना हा व्याजदर या कालावधीत ०.६५ ते १ टक्क्याने वाढू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधून ग्राहकाने गृहकर्ज घेतल्यास त्याला दररोज कर्जाचा आकडा कमी होईल अशापद्धतीचा व्याजदर पर्याय निवडता येतो. जर समजा एखाद्या ग्राहकाचा गृहकर्ज हप्त्याची तारीख २५ असेल आणि त्याने समजा त्याच महिन्याच्या ५ तारखेला आपला गृहकर्ज हप्ता जमा केला असेल तर ग्राहकाचा उरलेल्या २० दिवसांवरील व्याज देणे वाचते.
गृहकर्जाचा इन्शुरन्स काढला आहे का? : गृहकर्जाची रक्कम ही मोठी असते. सर्वसाधारणे वार्षिक उत्पन्नाच्या ५ ते ६ पटीने गृहकर्ज घेतले जाते. अशा मोठ्या गृहकर्ज रकमेसाठी इन्शुरन्स पाठबळ घेणे गरजेचे आहे. तसे पाठबळ घेतल्यास एखादी दुर्घटना घडली तरी त्याचा फटका गृहकर्जदाराच्या कुटुंबियांस बसत नाही.
गृहखरेदी करण्यापूर्वी कर्ज घेऊ नका : काही जण डाऊनपेमेंट भरण्यासाठीही कमी कालावधीसाठी वेगळे वैयक्तिक कर्ज छोट्या कालावधीसाठी काढतात. या कर्जाचा व्याजदर चढा असल्यामुळे बऱ्याचवेळी केवळ या कारणापायी ग्राहकाला गृहकर्ज नाकारले जाते. उदा. एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांसाठी वैयक्तिक कर्ज स्वरूपात घेतली असल्यास त्याचा मासिक कर्ज हप्ता ११ हजार १२२ रुपये असतो. मात्र तेवढ्याच हप्त्यामध्ये ग्राहकाला १४ लाख २५ हजार रुपये एवढ्या रकमेचे गृह कर्ज मिळू शकते.