आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाल्यानंतर पब्लिक इश्यूसाठी अर्ज करताना शेअर्स मागणी अर्जासोबत चेक, डिमांड ड्राफ्ट अथवा अँस्बा (ASBA – Application Supported by Blocked Amount) यांपैकी कोणत्याही एका पद्धतीने पेमेंट करता येत होते. (ASBA पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय 2008 पासून उपलब्ध आहे.) तथापि एक जानेवारी  2016 पासून ‘सेबी’ने ASBA पद्धतीनेच पेमेंट करणे बंधनकारक केले आहे आणि त्यामुळे ‘ASBA’ विषयी गुंतवणूकदारांना माहिती असणे आवश्यक आहे.
या पद्धतीमध्ये आपल्याला जेवढ्या शेअर्ससाठी अर्ज करायचा असेल, त्यासाठी लागणारी रक्कम (ही रक्कम प्राइस बँड, लॉट साइज व आपण मागणी करत असलेले एकूण लॉट यावर अवलंबून असते.) गोठवून ठेवण्याचा अधिकार आपल्या बँकेला देणे आवश्यक असते. उदा. मागील लेखात उल्लेख केलेल्या बंधन बँकेच्या पब्लिक इश्यूचा प्राइस बँड 370 ते 375 रुपये असा होता आणि लॉट साइज 40 होता. त्यामुळे पाच लॉटसाठी आपल्याला 75 हजार रुपये भरावे लागतील; मात्रASBA पद्धतीत 75 हजार रुपयांची रक्कम आपल्याला अर्जासोबत प्रत्यक्ष भरावी लागत नाही. आपल्या बँक खात्यात असलेल्या रकमेपैकी आपण अर्ज करीत असलेल्या लॉटसाठी आवश्यक असलेली रक्कम (वरील उदाहरणात ही रक्कम 75 हजार रुपये आहे) गोठवून ठेवण्याचा अधिकार आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना देण्याची सुविधा सर्व प्रमुख बँकांनी दिलेली आहे. या बँकांना सेल्फ सर्टीफाइड सिंडिकेट बँक (एससीएसबी) असे म्हणतात.
याउलट आपण शेअर्स मागणी अर्ज पारंपरिक फिजिकल पद्धतीने करत असाल, तर आपले ज्या बँकेतील खाते अर्ज केलेल्या रकमेसाठी गोठवून ठेवायचे असेल, त्या बँकेच्या खात्याचा सर्व तपशील देण्यासाठी शेअर्स मागणी अर्जात एक भाग असतो. त्या ठिकाणी प्रामुख्याने आपले संपूर्ण नाव, पत्ता, बँकेचे नाव, शाखा, खाते नंबर, आयएफएससी, मायकर कोड देऊन आपली सही करून तसा अधिकार देणे आवश्यक असते.
या दोन्हीही पद्धतींमध्ये आपण अर्ज केल्याच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष अलॉटमेंट होईपर्यंत आपण मागणी केलेल्या लॉटनुसार आवश्यक असलेली रक्कम आपल्या बँक खात्यातील शिल्लक रकमेतून गोठविली जाते. जेव्हा शेअर्सची प्रत्यक्ष अलॉटमेंट केली जाते, त्या वेळी आपल्याला अलॉट झालेल्या शेअर्सइतकीच रक्कम बँक खात्यातील गोठविलेल्या रकमेतून घेतली जाते व खात्यावरील गोठवणूक रद्द केली जाते.

अभिप्राय द्या!